मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले प्रकल्प आणि विविध नागरी कामांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाढता महसुली आणि भांडवली खर्च भागविण्यासाठी निधीचे तात्पुरते अंतर्गत हस्तांतर (अंतर्गत कर्ज) करण्यात येणार आहे. महसुली आणि भांडवली खर्चामुळे येत्या मार्चपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी तब्बल पाच ते दहा हजार कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्याचबरोबर धोकदायक बनलेल्या अनेक पुलांच्या बांधणीची कामे सुरू आहेत. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी जीर्ण जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. त्याचबरोबर सागरी किनारा मार्ग, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पायाभूत सुविध प्रकल्पांची कामेही हाती घेण्यात आली आहेत. विकास कामे आणि नागरी कामांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागणार आहे.
चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) हा खर्च भागविण्यासाठी प्रशासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूदही केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने सागरी किनारा मार्ग, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पायाभूत सुविध प्रकल्पांसाठी तब्बल १२ हजार २४५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याशिवाय अन्य नागरी कामांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तब्बल १६ हजार ६९९.७८ कोटी रुपये तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण करण्याचे अर्थसंकल्पातच प्रस्तावित केले आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात एकूण ठेवी ८१ हजार ७७४.४२ कोटी रुपयांवर होत्या. त्यात पायाभूत सुविधांसाठी ३९ हजार ५४३.६४ कोटी रुपये, तर बांधिल दायित्वापोटी ४२ हजार २३०.७८ कोटी रुपये राखीव निधीचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांसाठी राखीव निधीतून सुमारे १ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहेत.
परिणामी महापालिकेच्या ठेवी सुमारे ८० हजार कोटी रुपयांवर आल्या आहेत. चालू वर्षात सुरू असलेले प्रकल्प, विकास आणि नागरी कामांची देणी मार्च २०२६ पर्यंत द्यावी लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. परिणामी, तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणामुळे ठेवी पाच ते दहा हजार कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.
मुंबई महापालिकेच्या २०२५-२६ आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पामधील आकडेवारी पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध राखीव निधी (रुपये कोटींमध्ये)
पायाभूत सुविधा – रक्कम (कोटींमध्ये) – ३१.१२.२०२४ पायाभूत विकास निधी (फंजिबल एफएसआय) – ७९३५.७७ मालमत्ता पुनर्स्थापना निधी – ८.४४ मालमत्ता पुनर्स्थापना आणि पुनर्वसन निधी – १०३२४.२४ रस्ते आणि पूल बांधणी विकास निधी – ०.६२ भूमी संपादन आणि विकास निधी – ४२४.२२
प्राथमिक शालेय इमारत बांधकाम निधी – ३१९. ९६
प्राथमिक शालेय इमारत परिरक्षण निधी – ११.९९
विकास निधी – १२४ जे एमआरटीपी अधिनियम – ७२.८७
विकास निधी – डीसीआर ६ (बी) – ८४०१.८५
विकास निधी – मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा – ९०.३२
विशेष प्रकल्प निधी – १८४५.४६
संचित वर्ताळा घसारा निधीसह – १०१०७.९० एकूण – ३९५४३.६४
बांधिल दायित्वापोटी राखीव निधी (रुपये कोटींमध्ये)
भविष्य निर्वाह निधी – ५८५३.२० निवृत्तीवेतन निधी – ३९४९.८८
उपदान निधी – ७.७५ मुदत ठेवी (परिभाषित निवृत्तीवेतन योजना १) – ५१६०.२२
इतर विशेष निधी (परिशिष्ट सहानुसार) – २१००.१७ कंत्राटदार आणि इतर पक्षकारांची ठेव रक्कम – २१८५५.१५
खंदक ठेव व इतर अनुदान – ३३०४.४१ एकूण – ८१७७४.४२
