मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला होणार असून महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याबरोबरच उपमहापौरपद कोणाकडे जाणार आणि कोणाची वर्णी लागणार याचीही उत्सूकता लागली आहे. भाजपकडे बहुमत असून महापौर भाजपचाच होणार हे निश्चित झाले असून उपमहापौरपद हे शिवसेना (शिंदे) पक्षाकडे जाणार आहे. उपमहापौर पदीही महिलेचीच नेमणूक होणार असून त्याकरीता दोन नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत.

श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे यावेळी उपमहापौर पदावरही महिलाच विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेवर महिला राज असेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपचा महापौर होणार असून शिवसेना (शिंदे) पक्षाला उपमहापौर पद मिळणार आहे. महापौरपदासाठी जशी नावे चर्चेत आहेत तशीच नावे उपमहापौर पदासाठीही चर्चेत आहेत.

शिवसेना (शिंदे) पक्षाकडे १९ नगरसेविका

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असले तरी मुंबई महापालिकेत त्याहीपेक्षा अधिक महिला नगरसेविका निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम आहे. यंदा मुंबई महापालिकेवर तब्बल १३० नगरसेविका निवडून आल्या आहेत. एकूण २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग महिलांसाठी राखीव असताना यंदा १३० महिला निवडून आल्या आहेत. मुंबई महापालिकेत यंदा निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये सर्वाधिक नगरसेविका या भाजपच्या आहेत. त्याखालोखाल शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) यांचे उमेदवार आहेत. भाजपच्या ४९ नगरसेविका निवडून आल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ३८ नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या १९ नगरसेविका निवडून आल्या आहेत.

या दोन नावांची चर्चा

उपमहापौर पदासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्यावतीने माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि माजी नगरसेविका यामिनी जाधव यांची नावे चर्चेत आहेत. २०१४ मध्ये महापौर पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले होते. त्यावेळी स्नेहल आंबेकर आणि यामिनी जाधव यांची नावे चर्चेत होती. तेव्हा यामिनी जाधव यांना महापौर पदाने हुलकावणी दिली होती. तर तृष्णा विश्वासराव या अनुभवी नगरसेविका असून २०१४ च्या कार्यकाळात त्या सभागृहनेत्या होत्या. त्यामुळे या दोघींपैकी कोणाची तरी उपमहापौरपदावर वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे.