मुंबई : ‘आमचा आक्षेप जात, धर्म किंवा भाषेवर नाही, तर देशात अराजकता पसरवणाऱ्यांशी हातमिळवणी करणाऱ्यांवर आहे,’ अशा स्पष्ट शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेला सुनावले आहे. भविष्यात कोणाचे सहकार्य घ्यायचे याचे भान महापालिकेने ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला. अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या आवाहनावरून सुरू झालेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेला मिर्झा यांची हटवलेली चित्रफीत पुन्हा प्रसारित करण्याचे आदेश दिले.

मात्र, न्यायालयाने स्पष्ट सुनावल्यानंतरही भाजप नेत्यांकडून मिर्झा यांच्यावर टीका करणे सुरूच आहे. ‘न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो. परंतु, त्यांची निरीक्षणे वेगळ्या संदर्भात आहेत. संदेश मागे का घेतला याचे उत्तर पालिका प्रशासनच देऊ शकेल. मात्र, भारतविरोधी टुकडे टुकडे गँगविषयी सहानुभूती बाळगणाऱ्यांवर आमचा आक्षेप आहे. येत्या काळात कुठल्याही व्यक्तींना एखाद्या उपक्रमात वा मोहिमेत सहभागी करून घेण्यापूर्वी त्यांची माहिती घेतली तर या गोष्टी टळतील,’ अशी प्रतिक्रिया देत आपल्या भूमिकेवर कायम असल्याची प्रतिक्रिया साटम यांनी दिली.

दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी मिर्झा यांच्या सनातन हिंदू धर्माच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, ‘त्यांना सनातन हिंदू धर्माबद्दल काय माहिती आहे?’ असा सवाल केला. सेलिब्रिटींनी आपल्याला ज्या विषयाची माहिती आहे, त्यावरच बोलावे, इतर धर्मांच्या विषयात हस्तक्षेप करण्याचे कारण काय, अशी भूमिका त्यांनी मांडली. दिवाळी म्हणजे केवळ दहा लोकांनी एकत्र येऊन पार्टी करणे नव्हे.

धनत्रयोदशीपासून सुरू होणारा आणि तुळशीच्या लग्नापर्यंत चालणारा हा सण असून त्याला धार्मिक विधी, अनुष्ठान आणि पूजांचे महत्त्व आहे. याची माहिती दिया मिर्झा यांना आहे का, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. सनातन हिंदू धर्म हा सहिष्णु असून दुसऱ्याला त्रास न देणे, दुसऱ्याची चिंता करणे आणि कोणालाही दुःख न पोहोचवणे हाच त्याचा मुख्य गाभा असल्याचेही ते म्हणाले.