BMC Election Voting Percentage : तब्बल नऊ वर्षांनी मुंबईत पालिकेची निवडणूक होत असून मुंबईमधील २२७ प्रभागांसाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईत १०,२३१ मतदान केंद्रावर मतदान होत असून ठिकठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. तर अनेकठिकाणी गोंधळ झाल्याचं चित्र आहे. मतदान केंद्र न सापडणे, मतदार यादी नाव नसणे, बोटावरील शाई लगेच पुसली जाणे आदी विविध कारणांमुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुंबईत केवळ ६.५९ टक्केच मतदान झालं होतं. तर, सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झालं होतं.. आता दुपारी १.३० वाजेपर्यंत मुंबईत २९.९६ टक्के मतदान झालंय. दरम्यान, मुंबईमधील २२७ प्रभागांमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १७०० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरापालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान होत असले तरीही संपूर्ण देशाचे लक्ष मंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. गेली ३० -३५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. परंतु, त्याआधीच मुंबईतील मतदान प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांनी गोंधळ घातला आहे. गोरेगावातील मतदान केंद्रातील मतदार यादीत नाव न सापडल्याने अनेक मतदार माघारी फिरले आहेत. तर, काही मतदान अद्यापही मतदान केंद्र शोधत फिरत आहेत. दरम्यान, ज्या मतदारांनी मतदान केले आहे त्यांच्या बोटावरील शाई निघून जात असल्याची तक्रारही प्राप्त झाली आहे. त्यामुळे अशा ढिसाळ व्यवस्थापनावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
बोटावरील शाईवरून विरोधक सत्ताधारी आमने सामने
कोणत्याही पद्धतीने निवडून येण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. तसंच, बोटावरील शाई निघून जात असल्याने त्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “उद्याचा निकाल आल्यानंतर कोणत्या मुद्द्याला दोष द्यायचा याची तयारी सुरू आहे.”
