मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासह २६ विभागीय कार्यालयात वीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. विजेची बचत व खर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी वीज वापराचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याकरिता तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती वीज वापराचे मूल्यांकन करणार असून त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात येणार आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार असून यासाठी वीज वापराचा आढावा घेण्यासाठी तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

त्यात टाटा पॉवर, महापारेषण व महापालिका विद्युत व यांत्रिक विभागाचे निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश या समितीत असेल. ही समिती दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल महापालिकेला सादर करणार असून त्यात विजेच्या वापरासंदर्भात काही शिफारशी तसेच पालिकेच्यावतीने निर्मित केल्या ऊर्जा प्रकल्पांबाबतच्या शिफारशी अपेक्षित आहेत. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेच्या मुख्यालयासह विविध २६ प्रशासकीय कार्यालये तसेच इतर कार्यालयांमध्ये विजेचा वापर व ऊर्जा बचत आदींबाबत आढावा घेऊन सर्वंकष अहवाल बनवण्यासाठी तांत्रिक समितीची निवड करण्याचा निर्णय यांत्रिक व विद्युत विभागाने घेतला आहे. त्यात तज्ज्ञ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या वीज वापराच्या पद्धती, ऊर्जा बचतीची क्षमता तसेच महापालिकेच्या मालकीच्या कॅप्टिव्ह वीज निर्मिती प्रकल्पांच्या कार्यक्षेत्राचा सर्वंकष निदानात्मक अहवाल या समितीकडून अपेक्षित आहे.

या समितीकडून विश्लेषणाचे काम व अहवाल हे विशेष स्वरूपाचे काम केले जाणार आहे. तसेच आवश्यक तांत्रिक कौशल्याचे व वेळबद्ध स्वरूपाचे असल्याने या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश या तांत्रिक समितीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार आहे.