मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी मागितलेल्या माहितीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्याकडून उत्तर देण्यास विलंब होत असल्याचाही आरोपही कोटेचा यांनी केला आहे. त्यामुळे ढाकणे यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या बदल्यांचे प्रकरण ऑक्टोबर २०२५ मध्ये खूप गाजले होते. या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत बदल्यांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण खूप गाजले होते. या बदल्यांमध्ये ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा अर्थात बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याची लेखी तक्रार आमदार अमित साटम यांनीही केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या आदेशाने बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणी आता आमदार मिहीर कोटेचा यांनी मे महिन्यात महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून जुन्या १६५ बदल्यांच्या प्रस्तावातील सुमारे ५० टक्के अभियंत्यांचा समावेश असलेला नवीन बदली प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असल्याचे कोटेचा यांचे म्हणणे आहे. या पत्राची दखल घेऊन पालिका आयुक्तांनी प्रस्तावित बदली यादी रद्द केली, असेही कोटेचा यांनी मुख्य सचिवांना कळविले आहे.
‘रेट कार्ड’ची माहिती असल्याचा दावा दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. या अनियमिततेशी संबंधित ‘रेट कार्ड’सह माहिती आपल्याकडे असल्याचे कोटेचा यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून ५ ऑगस्ट २०२६ रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे माहिती मागितली होती. पत्राला २६ दिवस उलटूनही उत्तर मिळाले नसल्याची तक्रार आमदार कोटेचा यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
माहिती मिळाल्यास अनियमितता बाहेर येईल प्रमुख प्रश्नांची माहिती आणि उत्तरे मिळाल्यास बदल्यांमध्ये पुन्हा आर्थिक व्यवहार झाले आहे का, याबाबत निष्कर्ष काढता येईल. मात्र माहिती देण्यास होत असलेल्या विलंबामुळे अविनाश ढाकणे यांच्या भूमिकेबाबत आपला संशय अधिक तीव्र होत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे ढाकणे यांचीच चौकशी करावी अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.
कर्मचारी वर्गाकडे महत्त्वाची कामे असल्यामुळे विलंब ….
दरम्यान, याबाबत अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाने या प्रकरणी कोटेचा यांना उत्तर पाठवले असून त्यात नगर अभियंता विभागातील कर्मचारी वर्गाकडे महत्त्वाची कामे असल्र्यामुळे माहिती देण्यास विलंब होत असल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांकडे न्यायालयीन प्रकरणाबाबतची कामे सुरू असून कोटेचा यांनी मागितलेली माहिती विस्तृत स्वरुपाची असल्यामुळे ही माहिती संकलित होण्यास वेळ लागणार असल्याचेही या लेखी उत्तरात म्हटले आहे.
