लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : एकेकाळी तब्बल ९१ हजार कोटींवर असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच ७७ हजार कोटींवर आल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात चार हजार कोटींची घट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या मुदतठेवीतून प्रकल्पांसाठी निधी खर्च केला जात आहे. चालू आर्थिक वर्षातही ही प्रथा कायम असून एकूण २८,०६० कोटी या मुदतठेवीतून उचलले जाणार आहेत. त्यापैकी १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहेत तर १४,२९५ कोटी रुपये प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी हा नेहमीच उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय असतो. पालिका निवडणूकीच्या तोंडावर या मुदतठेवी पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. मुदतठेवी चाटायच्या आहेत का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मुदतठेवीवरूनही निवडणूकीच्यावेळी राजकारण झाले होते. त्यामुळे पालिकेच्या मुदठेवी किती आहेत याबाबत राजकीय वर्तुळात आणि मुंबईकरांमध्ये उत्सुकता असते. जानेवारी २०२६ अखेरीस ८१,४४९ कोटी रुपये पालिकेच्या मुदतठेवी होत्या. मात्र आर्थिक वर्ष संपताच या मुदतठेवींमध्ये चार हजार कोटींची घट झाली असून ३१ मार्च २०२६ ला मुदतठेवी ७७,९०५ कोटीपर्यंत कमी झाल्या आहेत. याबाबतची माहिती पालिकेच्या वित्त विभागाने स्थायी समितीला दिली आहे. चालू आर्थिक वर्ष संपताच त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये असतात. विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. त्या मुदतठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत असतो. पालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जात असतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो. करोना काळानंतर बांधकामाच्या अधिमूल्यात सवलत देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली व पालिकेला मार्च २०२२ मध्ये १४ हजार ७५० कोटींचा महसूल मिळाला होता. त्यामुळे पालिकेच्या मुदतठेवी मार्च २०२२ मध्ये तब्बल ९१ हजार कोटींच्या पुढे गेल्या होत्या. मात्र त्यानंतर या मुदतठेवींना उतरती कळा लागली आहे.

अशा घटल्या मुदतठेवी

३० जानेवारी २०२६ – ८१,४४९ कोटी

२८ फेब्रुवारी २०२६ – ८१,९१९.७१ कोटी

३१ मार्च २०२६ – ७७९०५.३९ कोटी

चालू आर्थिक वर्षातही निधीला हात

मुंबई महापालिका प्रशासनाने २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला तेव्हा एकूण ८१ हजार कोटींच्या मुदतठेवी होत्या. त्यापैकी ३६,६२३ कोटी हे प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेले आहेत. या निधीपैकी १४,२९५ कोटी पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी वापरले जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. तर आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी असलेल्या ४४ हजार कोटींच्या राखीव निधीतून १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहे. उत्पन्न जसे येईल तसे हे कर्ज पुन्हा मुदतठेवीत गुंतवले जाणार आहे. त्यामुळे हे अंतर्गत कर्ज स्वरुपात घेतले जाणार आहेत.