मुंबई : मुंबई शहराच्या नागरी व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा आज १५३ वा स्थापना दिवस असून १५३ वर्षांची अखंड परंपरा जपत मुंबईकरांना नागरी सुविधा देणारी महापालिकेने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या प्रशासकीय सेवांमध्येही बदल घडवला आहे. नागरिकांच्या १८८१ पासूनच्या जन्म-मृत्यू नोंदींचा दस्तावेज आता डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत व गौरवशाली इतिहास असलेली स्वायत्त संस्था आहे. ४ सप्टेंबर १८७३ रोजी या महापालिकेच्या पहिल्या लोकशाही सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हा दिवस मुंबई महापालिकेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबई महापालिकेने १५३ वर्षांच्या वाटचालीत शहराच्या बदलत्या गरजांनुसार आपल्या कार्यपद्धतीत बदल केले आहेत. ऐतिहासिक दस्तावेज आणि नागरिकांच्या जुन्या नोंदींचे जतन डिजिटल पद्धतीने केले जात आहे. वर्षानुवर्षे जतन केलेल्या या नोंदी आता डिजीटल स्वरुपात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी जन्म-मृत्यू नोंदींचे संपूर्ण डिजिटायझेशन वेगाने सुरू आहे.
महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमार्फत (CFC) ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, जुन्या कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात जतन करण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि नोंदी मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात जुन्या नोंदींचा शोध घेणे, त्यांचे जतन करणे आणि नागरिकांना त्यांची माहिती उपलब्ध करून देणे अधिक सोपे होणार आहे.
दरम्यान, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ४ सप्टेंबर रोजी मुंबई महापालिका स्थापना दिन भव्य आणि उत्साहात साजरा करण्याची मागणी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. स्थापना दिनानिमित्त प्रभागनिहाय नागरिकांच्या सहभागाने कार्यक्रम, महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक, रखडलेल्या विकासकामे व जनसुविधांबाबत घोषणा तसेच सफाई कामगारांसह महापालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागील चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत महापालिका स्थापना दिनासारख्या ऐतिहासिक दिवसाला प्रशासनाने केवळ औपचारिकतेचे स्वरूप दिले. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे वर्धापन दिनाचा सोहळा नीरस व केवळ ‘कागदी सोहळा’ ठरला. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये महापालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाली असतानाही प्रशासनाने या ऐतिहासिक टप्प्याकडे दुर्लक्ष केले. ही मुंबईकरांची तसेच महापालिकेच्या गौरवशाली परंपरेची घोर प्रतारणा असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला.
