मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे जनतेला काटकसर करण्याचा कानमंत्र दिलेला असताना मुंबई महानगरपालिकेतील भाजप – शिवसेना (शिंदे) महायुतीच्या राजवटीत मात्र शुल्लक कारणांसाठी पैशांची उधळपट्टी सुरू आहे. ई-मेल, वॉट्स ॲप, मोबाइलवर लघुसंदेशाद्वारे संदेश देण्याचे पर्याय उपलब्ध असताना केवळ स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीची बदललेली वेळ सदस्यांना कळविण्यासाठी दोन मोटारगाड्यांमधून शिपायांना पिटाळण्यात आले. मोटारगाडीसाठी खर्च झालेले डिझेल, चालक आणि शिपायाला अतिरिक्त कामाचा मोबदला आणि निवेदनपत्राची छपाई यासाठी प्रशासनाला विनाकारण खर्च सोसावा लागला.

पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका, पेट्रोल, डिझेल, तसेच खाद्य तेलाचा वापर कमी करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशातील जनतेला केले. अमेरिका, इस्रायल – इराण युद्धामुळे जगाला तेल संकटाचे चटके बसू लागले आहेत. तेल संकटाचे चटके भारतालाही बसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जनतेला वरील आवाहन केले. असे असतानाही भाजप – शिवसेना (शिंदे) महायुती सत्तास्थानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेत मात्र छोट्या छोट्या कारणांसाठी उधळपट्टी सुरूच आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक ३ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आल्याचे निवेदनपत्र महापालिकेच्या चिटणीस कार्यालयाने २९ मे २०२६ रोजी सदस्यांना पाठवले होते. त्याचसोबत बैठकीत सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांची सहपत्रेही सदस्यांना घरपोच करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी बोलावलेल्या आणि तहकूब झालेल्या बैठकांमधील काही अनिर्णित विषयांच्या प्रस्तावांवर सादरिकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि त्याविषयी महापालिकेच्या चिटणीस विभागाला कळवले. ही बाब लक्षात घेऊन सादरिकरणासाठी ३ जून रोजी दुपारी २ ऐवजी १२ वाजता बैठक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या वेळेत केलेल्या बदलाची माहिती सदस्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी २ जून रोजी नवी निवेदनपत्रिका तयार करण्यात आली.

ही निवेदनपत्रिका सदस्यांना घरपोच करण्यासाठी सीएसएमटी परिसरातील मुंबई महानगरपालिका मुख्यालयातून मंगळवार, २ जून रोजी सायंकाळी दोन मोटारगाड्या सज्ज करण्यात आल्या. मोटारगाडी चालक आणि चिटणीस विभागातील एक शिपाई असे दोघे नवी निवेदनपत्रिका सदस्यांना देण्यासाठी महापालिका मुख्यालयातून मंगळवारी सायंकाळी मोटारगाडीने निघाले. एका मोटारगाडी दहिसरच्या, तर दुसरी मोटारगाडी मुलुंडच्या दिशेने पाठविण्यात आली. स्थायी समितीमध्ये अध्यक्ष, सत्ताधारी – विरोधी असे एकूण २५ नगरसेवक आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष असे एकूण २७ सदस्य आहेत. नवी निवेदनपत्रिका या २७ सदस्यांना मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत घरपोच करण्यात आली.

मंगळवारी दिवसभराचे काम उरकलेल्या दोन शिपायांना संध्याकाळी नवी निवेदनपत्रिका सदस्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम देण्यात आले. हे काम पूर्ण करून घरी पोहोचण्यासाठी मध्यरात्र झाली. तर सदस्यांच्या घरी निवेदनपत्रिका दिल्यानंतर मोटारगाडी महापालिकेच्या गॅरेजमध्ये जमा करून घरी परतण्यास चालकांना बराच उशीर झाला. अतिरिक्त काम केल्याबद्दल या चौघांनाही अतिरिक्त मोबदला द्यावा लागणार आहे. त्याशिवाय मोटारगाडीसाठी डिझेलचाही वापर झाला. एकीकडे पंतप्रधानांनी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पण पंतप्रधानांच्या भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांना केवळ एक संदेश देण्यासाठी मोटारगाड्या पाठवाव्या लागल्या. प्रशासनाकडे २२७ नगरसेवकांचे मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आहेत. स्थायी समितीमधील २७ सदस्यांना वॉट्स अप, लघुसंदेशाद्वारे मोबाइलवर संदेश पाठवून किंवा थेट मोबाइलवर संपर्क साधून बैठकीची वेळ बदलल्याची सूचना देता आली असती. परंतु तसे न करता काटकसरीचे आवाहन धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले. या संदर्भात विरोधकांनीही मिठाची गुळणी घेतली आहे.