मुंबई : रस्त्यांवर कचरा टाकून अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कचरा साचणाऱ्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्याची सूचना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी नुकतीच यंत्रणांना दिली. रस्त्यांवर, नाल्यात घनकचरा टाकू नये, यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे, तसेच नदी – नाले, प्रमुख मार्ग, हमरस्ते या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करावी, प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट आदेश आयुक्त भिडे यांनी दिले.

पूर्व उपनगरातील मानखुर्द, गोवंडी तसेच शहर विभागातील परळ परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन आयुक्तांनी सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापनाचा आढावा घेतला. स्वच्छता कामाचे नियोजन सुनिश्चित करण्यासाठी अधिक परिणामकारक पद्धतीने कामकाज करण्यासह अन्य विविध निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक परिसराची भौगोलिक रचना, लोकसंख्या, कचरा निर्मितीचे प्रमाण आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन परिसरनिहाय स्वच्छता धोरण तयार करावे, असे निर्देश त्यांनी दिले. वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच प्राधान्याने झाडलोट करावी, असेही सांगितले.

कचरा संकलन, औषध फवारणीचा आढावा

  • मोटर लोडर चौकीला भेट दिल्यानंतर भिडे यांनी कचरा संकलन करणाऱ्या कॉम्पॅक्टर वाहनांची माहिती घेतली. वाहन नियोजित मार्गानुसार कार्यरत आहे का, कचरा संकलन वेळेत व प्रभावीपणे होत आहे का, कचरा उचलल्यानंतर औषध फवारणी केली जाते का, तसेच संकलित कचऱ्याची योग्य प्रकारे वाहतूक केली जात का, याची त्यांनी प्रत्यक्ष खातरजमा केली.
  • कचरा साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, रस्ते, नाले यांमध्ये घनकचरा टाकू नये यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे, असे त्या म्हणाल्या.
  • एम पूर्व विभागात कचरा संकलनाचे काम दररोज किमान दोन सत्रांत करावे, विशेषतः झोपडपट्टी व तत्सम दाट वस्तीच्या भागातील कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम, नियमित आणि परिणामकारक करून कोणत्याही ठिकाणी कचरा साचणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी.
  • स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या कर्मचाऱ्यांचाही सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या.

पदपथ स्वच्छ, चालण्यायोग्य, अतिक्रमणमुक्त ठेवावेत

पदपथ कायमस्वरूपी स्वच्छ, चालण्यायोग्य आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. पदपथांवर अनधिकृत वस्तू, बांधकाम साहित्य, फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारे अडथळे अथवा कचरा साचून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी नियमित पाहणी करून कार्यवाही करावी. पदपथांवरील अतिक्रमणे आणि अडथळे वेळोवेळी हटविण्यासोबतच त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी सातत्यपूर्ण देखरेख ठेवावी. तर नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना भिडे यांनी केल्या.