अमिताभ बच्चन यांना २०१७ साली रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत नोटिस बजावली होती. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मग मुंबई महानगरपालिकेने कुठलीच कारवाई का केली नाही, असा सवास काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी उपस्थित केला आहे.

रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्याची नोटीस त्यांना २०१७ साली पाठवण्यात आली होती. २०१९ मध्ये मुंबई महापालिकेने बंगल्याची हद्द सूचित करणारी भिंत हटवण्यात आली होती. मात्र त्यांच्या बंगल्याला काहीही करण्यात आलं नव्हतं. काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आणलं आहे. बाकी सर्व जागा पालिकेने ताब्यात घेतली आहे. तर मग बच्चन यांच्या मालकीचीच जागा अजून ताब्यात का घेतली नाही? नोटीस पाठवूनही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याबरोबर जर कारवाई झाली नाही, तर आम्ही याविरोधात तक्रार करु असा इशाराही मिरांडा यांनी दिला आहे.


नागरी सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठवून महापालिका फक्त वेळ घालवत आहे असा आरोपही मिरांडा यांनी केला आहे. मिरांडा यांना उत्तर देताना के-वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एकदा का नागरी सर्वेक्षण विभागाने प्रतिक्षा बंगल्याचा कोणता आणि किती भाग ताब्यात घ्यायचा आहे हे निश्चित केलं की महापालिका त्वरित कारवाई करुन हा भाग ताब्यात घेईल.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी प्रतिक्षा बंगल्याचा अपेक्षित भाग ताब्यात घेण्यासाठीचा विनंती अर्ज डिसेंबर २०१९ मध्ये केला आहे आणि आवश्यक ते शुल्कही भरलं आहे. यासाठीची मोजणी फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेली आहे. या भागाच्या भौगोलिक रचनेमुळे काही अडचणी येत आहेत मात्र या प्रकरणातली सर्व माहिती नागरी सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आली असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून कळत आहे.