मुंबई: मुंबई महापालिकेने आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महसूलाचा पर्याय म्हणून ग्रीन बॉण्डस अर्थात हरित कर्जरोख्यांची घोषणा चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केली होती. मात्र हे रोखे बाजारात येण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात मुंबई महापालिकेचे १००० कोटींचे रोखे बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. या हरित रोख्यांमधून गारगाई धरण, सात मलजल प्रक्रिया केंद्रे, जलबोगदे, अशा विविध कामांसाठी निधी उभारला जाणार आहे.
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक आहे. मुंबई शहराच्या वेगाने होणाऱ्या शहरीमुळे दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत असून त्याचा पायाभूत सेवा सुविधांवरही ताण पडतो आहे. त्यामुळे मुंबई शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेता मुलभूत नागरी सेवा सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उभारण्याकरीता मुंबई महापालिकेने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ग्रीन बॉण्डस अर्थात हरित रोख्यांची घोषणा केली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करताना अमृत २.० मिशन अंतर्गत अशा ग्रीन बॉण्डसची घोषणा केली होती. एकाच वेळी काढलेल्या १००० कोटींच्या बॉण्डससाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे पर्यावरणस्नेही प्रकल्पांसाठी असे बॉण्डस निर्गमित केले जातील अशी घोषणा मुंबई महापालिकेने केली आहे. डिसेंबरपर्यंत हे रोखे बाजारात येतील अशी अपेक्षा होती. मात्र बऱ्याच प्रक्रियांमुळे आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये हे रोखे बाजारात येण्याची शक्यता आहे. हरित रोखे बाजारात आणण्यापूर्वी बरीच मोठी प्रक्रिया मुंबई महापालिकेला पार पाडावी लागणार आहे. हे सगळे टप्पे पार पाडून रोखे बाजारात आणले जातील अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या कामासाठी सध्या कायदेविषयक सल्लागार नेमण्यात आले आहेत. तसेच पत मानांकन देणारी संस्था नेमण्यात आली आहे. हरित रोखे काढण्याआधी मुंबई महापालिकेला पत मानांकन करून घ्यावे लागणार आहे. या पत मानांकन देणाऱ्या संस्था संस्थांचे नियमन व नोंदणी सेबी या नियामक संस्थेमार्फत करण्यात येते. या नियामक संस्थेकडे एकूण आठ मानांकन संस्था नोंदणीकृत आहेत. त्यापैकी मे. इंडिया रेटिंग्ज आणि रिसर्च प्रा. लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.
या प्रकल्पांसाठी हरित रोखे मुंबई महापालिकेने मुंबई मलनिस्सारण प्रकल्प टप्पा २ अंतर्गत वरळी, धारावी, वर्सोवा, भांडूप, घाटकोपर, वांद्रे, मालाड येथे अद्ययावत मलजल प्रक्रिया केंद्रे उभारणाचे ठरवले असून त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच २०० दशलक्षलीटर क्षमतेचा निःक्षारीकरण प्रकल्प, जलबोगदे, तृतीय स्तरावरील प्रक्रिया केलेले सांडपाणी वहन करण्यासाठीचे जलबोगदे, गारगाई धरण प्रकल्प असे विविध प्रकल्प असून हे प्रकल्प पर्यावरणस्नेही आहेत. हरित रोख्यांद्वारे अशा पर्यावरणस्नेही प्रकल्पांसाठी निधी उभारता येतो. याकरीता येत्या काळात हरित रोखे काढले जाणार आहेत.
