मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईतील अत्यंत नामांकित अशा हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या आस्थापनांवर धाडी टाकून तेथी अस्वच्छता उघड केली व धडक कारवाई केली. या कारवाईमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर आता नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खाद्यपदार्थांच्या आस्थापनांना पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत परवाना दिला जातो. मग हे परवाने केवळ कार्यालयात बसून दिले होते का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. ज्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेशच महापौर रितू तावडे यांनी नुकतेच दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार घेताच तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील काही सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ आस्थापना, हॉटेल, उपाहारगृहे, मिठाईच्या दुकानांवर धाडी टाकल्या. गेल्या आठवड्यात चर्चगेट येथील के. रुस्तम या आईस्क्रीमच्या दुकानावरही छापा मारला, तेव्हा तिथे प्रचंड अस्वच्छता, माशा, उंदीर यांचा वावर आढळून आला. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पारसी डेअरी या दुकानातही अशीच अस्वच्छता आढळून आली होती. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे मुंबईतील खाद्यपदार्थांमधील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिका सभागृहात सोमवारी या विषयावरील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले की, मुंबई महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग मुंबईकर जनतेबाबत उदासीन आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठमोठी प्रसिद्ध उपाहारगृहे, मिठाईची दुकाने यावर धाडी टाकून कडक कारवाई केली. खरे तर हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे काम आहे. प्रत्येक हॉटेल, खाद्यसेवा पुरवणाऱ्या आस्थापना यांना मुंबई महापालिका परवाना देते. या आस्थापनांमध्ये स्वच्छता आहे का, अग्निशमन दलाची परवानगी आहे का, अधिकृत आहे का याची तपासणी करून परवाना दिला जातो. मात्र प्रत्यक्षात तसे दिसत नाही. या आस्थापनांच्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येते. मात्र कार्यालयात बसून हे नूतनीकरण केले जात असल्याचा आरोप फणसे यांनी केला. खरे तर अशा आस्थापनांमध्ये दर सहा महिन्यांनी कामगारांची वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. स्वच्छता, कीटकनाशक फवारणी करणे अपेक्षित आहे. मात्र हे नियम पाळले जात नाहीत. तरीही त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते, असा आरोप फणसे यांनी केला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा
अंधेरी सातबंगला परिसरात अनेक अनधिकृत खाद्य व्यवसाय सुरू असून राहिलेले अन्न असेच महापालिकेच्या कचरापेट्यामध्ये किंवा समुद्रात टाकले जाते. अनधिकृत असल्यामुळे पालिका त्यांचा कचरा उचलत नाही. मात्र तरीही मोमोजची विक्री करणाऱ्यांचे व्यवसाय सुरू असल्याचे फणसे यांनी सांगितले.
ज्या आस्थापनांवर एफडीएने धाड टाकून व्यवसाय बंद केले, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फणसे यांनी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावर फिरून धाडी टाकायला हव्यात, आतापर्यंत महापालिकेने किती आस्थापनांवर कारवाई केली त्याची माहिती द्यावी अशीही मागणी फणसे यांनी केली.
परवाने रद्द होणार ?
दरम्यान, गेल्याच आठवड्यात महापौर रितू तावडे यांनी मुंढे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच ज्या आस्थापनांवर एफडीएने कारवाई केली त्यांची चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करावे असे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच याबाबत लवकरच आढावा घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी स्पष्ट केले.
