मुंबई: विविध शारीरिक कारणांमुळे अपत्यप्राप्ती होत नसलेल्या दांपत्यांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात वंध्यत्वावरील ”आयव्हीएफ” ही उपचार पद्धतीची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या एका नगरसेविकेने ही मागणी केली असून येत्या महासभेपुढे ही मागणी विचारात घेण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेची चार प्रमुख रुग्णालये व १६ उपनगरी रुग्णालये आहेत. तसेच १९० सर्वसाधारण दवाखाने आणि २४८ आपला दवाखाना आहेत. तसेच ३० प्रसुतीगृहे आहेत. विविध प्रकारच्या रुग्णांवर पालिकेच्या या आरोग्य सेवांमधून उपचार केले जातात. मात्र वंध्यत्वाची समस्या ही सध्याच्या काळातील मोठी आरोग्य समस्या असून त्यावरील उपचार पद्धती पालिकेच्या रुग्णालयात सुरू करण्याची मागणी भाजपच्या माहीममधील नगरसेविका शीतल गंभीर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली, विवाहाचे वाढते वय, वाढता स्थुलपणा अशा अनेक कारणांमुळे, अनेक दांपत्यांना अपत्यप्राप्तीची समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा दांपत्यांना वंध्यत्वामुळे, मानसिक घुसमट, नैराश्य यांचा सामना करावा लागतो. ”आयव्हीएफ” ही उपचार पद्धती गेल्या ४५ वर्षांतील सर्वात मोठी वैद्यकीय क्रांती असून, अनेक जोडप्यांसाठी अपत्यप्राप्तीकरिता एक आशेचा किरण आहे. मात्र, या उपचार पद्धतीत प्रत्येक वेळी दीड ते अडीच लाख इतका खर्च येत असल्याने, अनेक दांपत्य अशा उपचारापासून वंचित राहतात तर, काही जोडपी आर्थिक समस्यांमुळे उपचार अर्धवट सोडून देतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपत्यप्राप्तीसाठी अडचण येत असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या दांपत्यांना ”आयव्हीएफ” उपचार पद्धतीची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शीतल गंभीर यांनी केली आहे.
अशी उपचार पद्धती पालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्यास अशा दांपत्यांना वंध्यत्वावर मात करून, अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होईल, असे गंभीर यांनी म्हटले आहे. गंभीर यांची ही ठरावाची सूचना महासभेच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. येत्या महासभेमध्ये या सूचनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या सूचनेला सभागृहाची मंजूरी मिळाल्यानंतर ही सूचना अभिप्रायासाठी पालिका प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रशासन या सूचनेवर काय निर्णय घेईल याबाबत उत्सुकता आहे.
