मुंबई : सुधार समितीच्या पटलावर ठेवण्यात आलेले प्रस्ताव मुंबईकरांच्या हिताचे नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रस्तावांच्या निषेधार्थ विरोधकांनी बुधवारी हाताला काळ्या फिती बांधून सुधार समितीच्या बैठकीत प्रवेश केला. दरम्यान, बैठकीत झालेल्या चर्चांमध्ये एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. एकूण सातपैकी दोन प्रस्ताव फेरविचार्थ प्रशासनाकडे परत पाठविण्यात आले. तसेच, उर्वरित प्रस्ताव राखून ठेवण्यात आले.
सुधार समितीच्या बैठकीत एकूण सात प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी सर्व प्रस्तावांना विरोधकांनी विरोध केला. सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी एकही प्रस्ताव लोकहित साधणारा नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांनी काळ्या फिती बांधून त्या प्रस्तावांना विरोध दर्शविला.
तसेच, प्रभावी भाषणे करून विविध आक्षेपार्ह मुद्दे व त्रुटी प्रशासन व सत्ताधाऱ्यांसमोर मांडल्या. विशेष म्हणजे विरोधकांनी विरोध दर्शविलेल्या प्रस्तावांपैकी एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. सुधार समितीचे अध्यक्षपद शिवसेना (शिंदे) पक्षाकडे असल्याने एकही प्रस्ताव मंजूर न होणे हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
सुधार समितीच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास देणे, उपनगरातील पाच प्रमुख रुग्णालयांतील रक्तपेढ्या पीपीई तत्वावर चालविण्याचा प्रस्ताव, एच पश्चिम विभागातील क्रीडांगण/खेळाच्या मैदानावर प्रदर्शन केंद्र बांधण्यासाठी आरक्षणात फेरबदल करणे, मलबार हिल येथील भूखंडाचे आरक्षण फेरबदल करणे आदी प्रस्तावांचा समावेश होता. मात्र, हे प्रस्ताव लोकांच्या हिताचे नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला.
काही प्रस्तावांवर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीही आक्षेप घेतला. प्रस्तावांबाबत झालेल्या चर्चेत दोन प्रस्ताव फेरविचारार्थ परत पाठविण्यात आले. आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावांना विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याची सूचना केल्याची पालिकेत चर्चा होती. त्यानुसार शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेवकांनी आपली भूमिका चोख पार पडली. काँग्रेस पक्षानेही त्यांना साथ दिली.
