लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : चर्चगेट, कुलाबा, हुतात्मा चौकात राहणाऱ्या रहिवाशांना पालिकेशी संबंधित विषयांवर तक्रारी करता याव्यात याकरीता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित व्हॉट्सॲप नागरी सहाय्यक आणि तक्रार नोंदणी प्रणाली तयार करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी ‘हॅलो ए वॉर्ड’ या चॅटबोट प्रणालीचे उद्घाटन केले.

नागरी समस्यांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी कुलाबा, कफ परेड आणि फोर्ट परिसरातील रहिवाशांना महापालिका कार्यालयात जाण्याची किंवा स्वतंत्र मोबाइल ॲप डाउनलोड करण्याची गरज आता राहणार नाही. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरी तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी ‘हॅलो ए वॉर्ड’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित चॅटबॉटची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेले हे चॅटबॉट, नागरिकांना साध्या संवादात्मक संदेशांच्या माध्यमातून नागरी तक्रारी नोंदवता याव्यात आणि त्यांचे निवारण अधिक सुलभ व्हावे, यासाठी विकसित करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली.

खासगी निवासी इमारतींमधील वादाच्या तक्रारी नको

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती आणि बंद पडलेले पथदिवे यांसारख्या समस्यांचा यात समावेश आहे. मात्र, खासगी निवासी इमारतींमधील वाद या सुविधेच्या कक्षेत येणार नाहीत असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

एआय मदत करणार

ही प्रणाली कशी काम करेल याबाबत सांगताना भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर म्हणाले की, उदाहरण द्यायचे तर समजा कुलाब्यातील फर्स्ट पास्ता लेन येथे कचरा उचलला जात नसल्याची तक्रार एखाद्या नागरिकाने छायाचित्रासह नोंदवली, तर एआय सहाय्यक आवश्यक ठिकाणाची माहिती गोळा करतो आणि संबंधित समस्या सोडवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या महापालिका अधिकाऱ्याचे नावही नागरिकाला सांगतो. नागरिकाने तक्रारीची माहिती निश्चित केल्यानंतर, प्रणाली एक विशिष्ट तक्रार क्रमांक आणि तक्रारीचा संक्षिप्त सारांश तयार करते. यामुळे तक्रारीचा संदर्भ ठेवणे सोपे होते, असे त्यांनी सांगितले.

तक्रार नोंदवण्यापुरतीच ही सुविधा मर्यादित नसून, ‘हॅलो ए वॉर्ड’च्या माध्यमातून तक्रारीच्या निवारण प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. तक्रार नोंदणी, संबंधित विभागाकडे वर्ग करणे, प्रत्यक्ष काम सुरू होणे आणि अंतिम निराकरण अशा प्रत्येक टप्प्यावरील प्रगती नागरिकांना पाहता येईल. जबाबदारी निश्चित करण्यासाठी, तक्रारीच्या स्थितीबाबतचे अद्ययावत संदेश थेट नागरिकांच्या व्हॉट्सॲप चॅटवर पाठवले जातील. काम पूर्ण झाल्यानंतरची आणि कामापूर्वीची छायाचित्रेही उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे नागरिकांना तक्रारीच्या स्थितीबाबत अनिश्चितता राहणार नाही, तसेच वारंवार पाठपुरावा करण्याची किंवा महापालिका कार्यालयात जाण्याची गरज कमी होईल, असेही नार्वेकर यांनी पुढे स्पष्ट केले.

अनेक महिन्यांच्या चाचणीनंतर हा चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. सामान्य नागरी समस्यांचे निराकरण वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. हा चॅटबॉट मानवी हस्तक्षेप कमी करत असला, तरी संबंधित अधिकारी मात्र जबाबदार राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.