मुंबई – मुंबई महापालिकेच्या विधि विभागातील एका वकिलाचा गेल्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच विभागातील आणखी एका वकील महिलेला मुख्यालयातच हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच आठवड्यात ह्रदयविकाराच्या दोन घटना घडल्यामुळे विधि विभागात कामाचा अतिरिक्त ताण असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या विभागातील अनागोंदी कारभारामुळे कायदा अधिकाऱ्यांना काम करणे कठीण झाल्याचीही चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या विधि विभागातील वकील कुणाल वाघमारे यांचे गेल्या आठवड्यात मंगळवारी पालिका मुख्यालयातच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी शुक्रवारी सहाय्यक कायदा अधिकारी संगीता होनमाने यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. त्यांना तत्काळ मुंबई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संगीता यांच्याकडे चेंबूर, गोवंडीचा भाग असलेल्या एम पश्चिम विभागाची जबाबदारी होती. त्या शुक्रवारी कामानिमित्त पालिका मुख्यालयात आल्या असता त्यांनाही पालिका मुख्यालयातच हृदयविकाराचा झटका आला होता.
दरम्यान, या दोन घटनांमुळे मुंबई महापालिकेचा विधि विभाग चर्चेत आला आहे. मुंबई महापालिकेशी संबंधित विविध विभागांचे खटले विविध ठिकाणी न्यायालयात सुरू आहेत. शहर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा ठिकाणी सुमारे लाखभर खटले प्रलंबित असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. मात्र ही सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विधि विभागात केवळ ७४ सहाय्यक कायदा अधिकारी आहेत.
आधीच कामाचा ताण प्रचंड असताना या अधिकाऱ्यांची दरवर्षी किंवा एकाच वर्षात अचानक बदली केली जात असल्यामुळे या विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे कायदा अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे न्यायप्रक्रियेतील सातत्य हरवते, खटल्यांच्या सुनावणीत व्यत्यय येतो, असे मत तेथील काही वकिलांनी व्यक्त केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विधि विभागात काम करणाऱ्या सहायक कायदा अधिकाऱ्यांची अवस्था ही कायदेतज्ज्ञांपेक्षा एखाद्या कर्मचाऱ्यासारखी झाली आहे.
कोर्टात महानगरपालिकेची बाजू मांडणे, माहिती अधिकाराचा अर्ज हाताळणे, सॅंक्शन नोट तयार करणे, अपील ड्राफ्ट तयार करणे अशी विविध कामे त्यांना करावी लागत आहेत. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे.