मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी गणेशोत्सवानिमित्त तयार केलेले उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी ‘मोदक महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांना संपूर्ण गणेशोत्सवात मोदकांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तसेच मुंबईकरांना १४ सप्टेंबरपासून
मोदक घरपोच मिळू शकणार आहेत.
गणेशोत्सवात मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांकडून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत उकडीचे आणि तळलेले मोदक ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नागरिक https://shgeshop.com या संकेतस्थळावर मोदकांची ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना १४ सप्टेंबर २०२६ पासून मोदकांचे घरपोच वितरण केले जाणार आहे. घरपोच वितरण सेवा केवळ मुंबईमध्ये उपलब्ध राहणार आहे. हा मोदक महोत्सव संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत सुरू राहणार आहे. मुंबईकरांनी केवळ एक दिवस आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने दिली.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न
मुंबई महानगरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, तसेच स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी आणि त्यांना व्यवसायाच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध नाविन्यपूर्ण व व्यवसायाभिमुख उपक्रम राबविण्यात येतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘मोदक महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेले दर्जेदार मोदक नागरिकांना उपलब्ध होणार असून, गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार असल्याची माहिती मीनल तुर्डे यांनी दिली.
