मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेत इंग्रजी भाषेत व्यवहार होत असल्याची खंत शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक सचिन पडवळ यांनी मराठी भाषा दिनी व्यक्त केली. महानगरपालिकेतील ८० टक्के कारभार इंग्रजी भाषेत होतो, असा दावा करत यापुढे कामाच्या निविदा व अन्य कामकाज मराठीत करण्याची मागणी पडवळ यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे शुक्रवारी केली.

मुंबई महानगरपालिकेचे सर्व कामकाज १०० टक्के मराठी भाषेत असावे, असा ठराव सुमारे दहा वर्षांपूर्वीच महापालिका सभागृहात मंजूर झाला. परंतु मराठी भाषा दिन पंधरवडा पाळणारी मुंबई महानगरपालिका १०० टक्के मराठी भाषिक झालीच नाही. मुंबई महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींनी १०० टक्के मराठी भाषा स्वीकारली असली तरी प्रशासनाने या भाषेला दुय्यम स्थान दिले आहे. महापालिका प्रशासनाचा ८० टक्के कारभार आजही इंग्रजी भाषेत होतो.

पालिका प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कामांच्या निविदा. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या विभागांच्या निविदा पूर्णपणे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे मराठी जाणणाऱ्या लहान-मोठ्या ठेकेदारांना, तसेच नागरिकांना त्या समजणे कठीण होते. महापालिकेत मराठी भाषेचा जास्त वापर केला जात नाही.

महापालिकेतील अधिकारी किंवा राज्यातून येणारे सनदी अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार इंग्रजी भाषेत होतो, असा दावा पडवळ यांनी केला. कामांच्या निविदा देखील इंग्रजी भाषेत जारी करण्यात येतात. केवळ लोकप्रतिनिधींनी मराठीत पत्रव्यवहार केला म्हणून त्यांना मराठी भाषेत उत्तर दिले जाते. परंतु अधिकाऱ्यांकडून आजही निवेदन, पत्रके, निविदा इंग्रजी भाषेमध्ये जारी करण्यात येतात, ही बाब खेदजनक असल्याचे पडवळ यांनी नमूद केले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषेचा प्रसार केला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेतील सर्व निवेदन, पत्रके, निविदा मराठीतूनच जारी कराव्या. जेणेकरून अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांनाही मराठी शिकावे लागेल. परिणामी, मराठी भाषेचा प्रसार वाढेल, असे त्यांनी नमूद केले.