मुंबई : मुंबई महापालिकेने दुकानांवरील मराठी नामफलकांबाबत मोहीम हाती घेतल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मुंबईतील प्रसिद्ध नामांकित आस्थापना, शॉपिंग मॉल आणि शॉपिंग सेंटरमधील दुकाने व गाळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मराठी नामफलकाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे.
गेल्या दोन तीन वर्षांपासून मागे पडलेला मराठी पाट्यांचा मुद्दा मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. ज्या दुकानांवर, हॉटेल्सवर मराठीत नामफलक नाहीत अशा सर्व आस्थापनांना नामफलक मराठीत करण्यासाठी एका महिन्याची मुदत शिवसेना (शिंदे) पक्षाने मे महिन्यात दिली होती. एक महिन्यात हे फलक मराठीत बदलले नाही तर आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा उपमहापौर संजय घाडी यांनी दिला होता. त्यानंतर जून महिन्यात पालिका प्रशासनाने मराठी नामफलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती. गेल्या दोन तीन महिन्यात केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी नुकतीच एक बैठक पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर घेतली. त्यावेळी मुंबईतील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी अक्षरातील नामफलक लावण्याच्या नियमाची अंमलबजावणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात ३६ हजाराहून अधिक आस्थापनांची पाहणी
पहिल्या टप्प्यात १४ मे ते ४ जून या कालावधीत तब्बल ३६,७७३ आस्थापनांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी १,१२४ आस्थापनांचे निरीक्षण अहवाल तयार करण्यात आले, तर ६३८ आस्थापनांविरोधात न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील १,१२४ प्रकरणांपैकी ३४३ आस्थापनांनी अपराध सामोपचाराने मिटविण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी १९० आस्थापनांकडून १२ लाख २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आणखी १४३ प्रकरणांतील न्यायालयीन कारवाई अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
काही आस्थापनांनी पुन्हा तपासणी
विधी समितीच्या अध्यक्षा दिक्षा कारकर यांच्या अध्यक्षतेखाली १३ ऑगस्ट रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात आला. एस. व्ही. रोड, एल. बी. एस. रोड, लिंक रोड तसेच पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गांच्या दुतर्फा असलेल्या बाजारपेठा, दुकाने आणि आस्थापनांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मागील टप्प्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांपैकी प्रत्येक विभागातील दोन-तीन आस्थापनांवर कठोर न्यायालयीन कारवाई करून त्याची प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय पुढील टप्प्यात मुंबईतील प्रसिद्ध नामांकित आस्थापना, शॉपिंग मॉल आणि शॉपिंग सेंटरमधील दुकाने व गाळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मराठी नामफलकाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
