मुंबई : महापौर विकास निधीच्या वाटपाचा सर्वाधिक लाभ घाटकोपरच्या भाजपच्या नगरसेवकांना झाला आहे. महापौर रितू तावडे या घाटकोपरमधील नगरसेविका असून, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण ४२ कोटींचा निधी देण्यात आला आहे. घाटकोपर पूर्व आणि पश्चिममध्ये मिळून ५८ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७ चा ८०,९५२ कोटींचा अर्थसंकल्प ८ मे रोजी मंजूर झाला. अर्थसंकल्पात फेरफार करून प्रथेनुसार महापौरांनाही विकासनिधी म्हणून अडीचशे कोटींचा निधी देण्यात आला आहे. महापौरांच्या शिफारशीनुसार तो नगरसेवकांना वितरित करण्यात आला आहे. स्थायी समितीमधील विकासनिधीच्या वाटपावरून वाद झाल्यानंतर महापौर विकास निधीचे वाटप कसे होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र महापौर रितू तावडे यांनीही भाजपच्या नगरसेवकांना भरभरून निधी दिला असून त्याखालोखाल शिवसेना (शिंदे) पक्षाला निधी दिला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना निधीच दिलेला नाही. महापौर विकास निधी वाटपातही विरोधकांना निधी न मिळाल्यामुळे वाद उद्भवला आहे. दिंंडोशी येथील मनसेच्या नगरसेविका सुरेखा लोके यांनी आपला प्रभाग दत्तक घ्या अशी मागणी रितू तावडे यांच्याकडे केली आहे.
भाजपला झुकते माप
महापौर विकास निधीतील २०० कोटी रुपये निधी सत्ताधारी महायुतीला देण्यात आला. यामध्ये भाजपच्या नगरसेवकांना एकूण १४५.५ कोटी रुपये, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना ५४.५ कोटी रुपये निधी देण्यात आला. विरोधी पक्षांना मिळून फक्त ६ कोटी रुपये निधी देण्यात आला. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना १ कोटी रुपये, तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या दिपमाला बढे आणि यशोधर फणसे यांनाही प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यात आले. काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि एआयएमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनाही प्रत्येकी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
खंडोबा टेकडीसाठी १५ कोटी …
घाटकोपर पूर्वमध्ये रितू तावडे यांच्या प्रभाग क्रमांक १३२ मध्ये एकूण ११ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर त्यांच्याच प्रभागातील खंडोबा टेकडीच्या सुशोभिकरणासाठी १५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. असा एकूण २६ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
आधीच्या कार्यकाळात भाजपच्या नगरसेवकांना निधीच दिला नव्हता. आतापर्यंत मला इतक्या वर्षात कधीही महापौर विकास निधी मिळाला नाही. मुंबई महापालिकेच्या सर्व नगरसेवकांना १ कोटी ६० लाखांचा निधी सरसकट मिळतो. त्यातही विकासाची कामे करता येतात. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा अभ्यास करावा.-रितू तावडे, महापौर
घाटकोपर पूर्वमध्ये निधी ….
१३० धर्मेश गिरी (भाजप) ५ कोटी
१३१ राखी जाधव (भाजप) १० कोटी
१३२ रितू तावडे (महापौर) २६ कोटी
१३३ निर्मिती कानडे (शिवसेना-शिंदे) १ कोटी
घाटकोपर पश्चिम
१२६ अर्चना भालेराव (भाजप)१० कोटी
१२५ सुरेश आवळे (शिवसेना-शिंदे) ४ कोटी
१२९ अश्विनी मते (भाजप) २ कोटी
