मुंबई : महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मोदक महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महिला बचत गटांने तयार केलेले उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईकरांना दर्जेदार तसेच सुरक्षित मोदक मिळावेत, यासाठी महिला बचत गटांना अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

दरवर्षी गणेशोत्सवात घरोघरी गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक बनविले जातात. मात्र, अनेक वेळा कामाच्या व्यापात गृहिणींना मोदक बनविणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबईकरांना चविष्ट मोदक उपलब्ध करून देण्यासोबतच बचत गटाच्या महिलांना रोजगार देण्याच्या उद्देशाने मोदक महोत्सव आयोजित केला जातो. यंदा गणेशोत्सवात नागरिकांना महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी तयार केलेले उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईकर https://shgeshop.com या संकेतस्थळावर मोदकांसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. या उपक्रमातून महिला बचत गटांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळण्यासोबतच मुंबईकरांना दर्जेदार मोदक उपलब्ध करून देण्याचा दुहेरी उद्देश साध्य होणार आहे.

अन्नसुरक्षेच्या नियमांबाबत मार्गदर्शन यंदा मोदक महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिला बचत गटांना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने अन्न सुरक्षेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मोदक बनवताना स्वच्छता कशी राखावी, तसेच अन्नसुरक्षा, अन्न हाताळणी, कच्च्या मालाची गुणवत्ता आणि पॅकिंग याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणानुसार महिला बचत गटांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करून मोदक निर्मितीस सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांना घरगुती चवीचे, स्वादिष्ट तसेच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन करून तयार केलेले गुणवत्तापूर्ण मोदक उपलब्ध होत आहेत.