मुंबई : मुंबई शहरातील वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बहुउद्देशीय भूमिगत बोगद्यांचे जाळे विकसित करण्याचा प्रकल्पा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिगत बोगद्यातील एका स्तराचा वापर वाहतुकीसाठी, तर दुसऱ्या स्तराचा वापर उपयुक्तता सेवा व मलनि:सारण प्रणालीसाठी करण्यात येणार आहे. मलनिःसारण प्रणालीचा वापर मुसळधार पाऊस कोसळू लागताच पूर प्रतिबंधक उपाय म्हणूनही करता येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत पावसाळ्यात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा झटपट करण्यास मदत होणार आहे.

गेल्या काही दशकांमध्ये मुंबईच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच मुंबईतील वाहन संख्येतही बेसुमार वाढ झाली आहे. अरुंद रस्ते आणि वाहनांची मोठी संख्या यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न ज्वलंत झाला आहे. तसेच पावसाळ्यात मुसळधार पाऊस कोसळताच मुंबईतील सखलभाग जलमय होऊन मुंबईकरांना फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बहुउद्देशीय भूमिगत बोगद्यांचे जाळे विकसित करण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे.

प्रकल्पामध्ये बहुस्तरीय बोगद्यांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. या बोगद्यांची आखणी एका स्तरावर वाहतूक आणि दुसऱ्या स्तरावर उपयुक्तता सेवा व मलनिःसारण प्रणाली अशा स्वरुपात करण्यात येणार आहे. मलनिःसारण प्रणालीचा वापर मुसळधार पाऊस कोसळू लागताच पूर प्रतिबंधक उपाय म्हणूनही करता येणार आहे.

या प्रकल्पासाठी ६ किलोमीटरकरिता ४३९२ कोटी रुपये (प्रति किलोमीटर ७३२ कोटी रुपये) इतका खर्च अपेक्षित असून कंत्राट कालावधी ६६ महिने निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे, बृहत आराखडा व विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया व्यवस्थापन, तसेच प्रस्तावित बांधकामांचे पयर्वेक्षण या कामांसाठी १५ जानेवारी २०२५ रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला कार्यादेश देण्यात आले आहेत.