मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळील जीर्णावस्थेत असलेल्या क्रीडा भवन इमारतीच्या भूखंडावर सहा मजली नवे सभागृह उभारण्यात येणार आहे. पालिका मुख्यालयातील सभागृह २२७ नगरसेवकांसाठी अपुरे पडत असल्यामुळे ३३० ते ३५० सदस्य क्षमतेचे अत्याधुनिक चित्रपटगृहाच्या शैलीतील सभागृह बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच स्थायी समितीत मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार आहे. या वर्षाअखेरीस या सभागृहाचे काम सुरू करण्यात येणार असून दोन वर्षांत हे सभागृह तयार करण्याचे उद्दिष्ट्य सत्ताधाऱ्यांनी ठेवले आहे.
पालिका मुख्यालयासमोर क्रीडा भवन असून त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे क्रीडा भवनाच्या जागी टाऊन हॉल जिमखाना साकारण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले होते. त्याबाबतचा प्रस्ताव मार्च महिन्यात स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव अपूर्ण असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी तो परत पाठवला होता. या क्रीडाभवनच्या जागी आता मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून आधीच्या प्रस्तावातील कंत्राटदारालाच हे काम दिले जाणार आहे. या कामासाठी सुमारे ३० कोटी खर्च अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेचे सभागृह पुरातन असून या सभागृहाची क्षमता आता कमी पडू लागली आहे. २२७ नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यसाठी हे सभागृह अपुरे पडू लागले आहे. सगळे २२७ नगरसेवक उपस्थित असतात तेव्हा हे सभागृह कमी पडते. नगरसेवकांना अतिशय दाटीवाटीने बसावे लागते. येत्या काळात आणखी दहा नामनिर्देशित नगरसेवक आल्यानंतर नगरसेवकांना बसायला जागाच उरणार नाही अशी स्थिती आहे.
त्यामुळे भविष्यात नगरसेवकांची संख्या आणखी वाढल्यास त्यानुसार व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हे नवीन सभागृह बांधले जाणार असल्याची माहिती सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली. सध्या पालिका सभागृहात २२७ निवडून आलेले आणि १० नामनिर्देशित अशा एकूण २३७ सदस्यांची व्यवस्था आहे. मात्र भविष्यात प्रभागरचना आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे सदस्यसंख्येत वाढ होण्याची शक्यता गृहित धरून नव्या सभागृहात ३३० नगरसेवकांसाठी आसनव्यवस्था प्रस्तावित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहाच्या अंतर्गत कामासाठी नव्याने कंत्राट देण्यात येणार असून या कामाचा खर्च सुमारे दहा टक्क्यांनी वाढू शकेल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही इमारत श्रेणी-१ वारसा वास्तू असलेल्या पालिका मुख्यालयासमोर उभारली जाणार असल्याने वारसा संवर्धन समितीची मंजुरी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच सध्या या जागेखाली कार्यरत असलेली दुकाने सुरू राहणार असली तरी त्या ठिकाणी स्वयंपाक करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
असे असेल नवीन सभागृह
सुमारे ९०० चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सहा मजली इमारतीत तळमजल्यावर सुमारे ६० वाहनांसाठी वाहनतळाची सुविधा असेल. पहिला आणि दुसरा मजला पोडियमसाठी राखीव असेल. तिसऱ्या मजल्यावर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जिमखाना उभारण्यात येणार आहे. चौथ्या मजल्यावर महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांची कार्यालये असतील. पाचवा आणि सहावा मजला एकत्रित करून अत्याधुनिक थिएटर-शैलीतील विधीमंडळाच्या धर्तीवर सभागृह तयार करण्यात येणार आहे.
या सभागृहात नगरसेवकांसोबतच पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरी आणि महापालिका सभांसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.अशी असेल नवी इमारत ! तळमजला : ६० वाहनांसाठी वाहनतळ पहिला व दुसरा मजला : पोडियम तिसरा मजला : कर्मचाऱ्यांसाठी जिमखाना, बॅडमिंटन कोर्ट चौथा मजला : महापौर, उपमहापौर व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये पाचवा व सहावा मजला : ३३० ते ३५० आसनक्षमतेचे थिएटर-शैलीतील सभागृह व पत्रकारांसाठी गॅलरी
