मुंबई: मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाईची कामे संथ गतीने सुरू असताना सत्ताधारी घटकपक्षातील राजकारण मात्र वेगाने सुरू आहे. महापौर रितू तावडे यांनी नालेसफाईच्या पाहणीदौऱ्याला न बोलावलेल्या उपमहापौर संजय घाडी यांनी जाहीर आक्षेप घेतल्यानंतरही भाजपने मंगळवारी नालेसफाईचा स्वतंत्र दौरा आयोजित केला होता. मंगळवारी आमदार अमीत साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नालेसफाई कामांची पाहणी केली. मात्र हा दौरा पालिकेचा नव्हता तर तो भाजपचा होता असा युक्तीवाद भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
पावसाळा सुरू होण्यास अगदी काही दिवस उरले असून नालेसफाईच्या कामांना वेग देण्यासाठी आता पालिका प्रशासन आणि सत्ताधारी दोघेही कामाला लागले आहेत. गेल्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी महापौर रितू तावडे यांनी पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.
मुंबई महापालिकेत प्रथमच सत्तेवर आलेल्या भाजपची येत्या पावसाळ्यात कसोटी असून त्या पार्श्वभूमीवर यंदा नालेसफाईसाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. महापौर रितू तावडे यांचे नालेसफाईचे हे दोन दौरे झाल्यानंतर गेल्या आठवड्यात गुरुवारी उपमहापौर संजय घाडी यांनी नालेसफाईचा दौरा आयोजित केला. महापौरांनी नालेसफाईच्या दौऱ्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना दिली नाही असा आक्षेप उपमहापौर संजय घाडी यांनी घेतला होता.
घाडी हे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे दहिसरमधील नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे महायुतीत समन्वय नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली होती. घाडी यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप घेतल्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली होती. पाहणी दौऱ्याला सर्वजण एकत्र फिरल्यास अधिक चांगले परिणाम दिसतील. मात्र वेगवेगळे फिरले तरी हरकत नाही असेही खणकर यांनी स्पष्ट केले होते.
मंगळवारी भाजपचा दौरा
हा वाद मिटत नाही तोच मंगळवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी पूर्व उपनगरातील नालेसफाई पाहणीचा दौरा केला. आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर परिसरातील नालेसफाई कामांची पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरांचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, पालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर, आमदार मिहिर कोटेचा आणि आमदार पराग शाह, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र या दौऱ्याला शिवसेना (शिंदे) पक्षाच्या एकाही नगरसेवकाला गटनेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. याबाबत सभागृह नेते गणेश खणकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हा भाजपचा पाहणी दौरा होता. गेल्या दोन तीन वर्षांपासून मुंबई भाजपच्या वतीने असा पाहणी दौरा आयोजित केला जातो. तसाच हा दौरा होता.
दौऱ्याला गाड्यांचा ताफा
मंगळवारी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या नालेसफाईच्या दौऱ्यात वाहनांचा मोठा ताफा असल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी या प्रकरणी समाजमाध्यमावर मजकूर लिहिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला पेट्रोल-डिझेल बचतीचे सल्ले देतात आणि दुसरीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष नालेसफाई पाहणीसाठी ३५ गाड्यांचा ताफा घेऊन सत्तेचा माज दाखवतात. मंबई महागाई, वाहतूक कोंडी आणि पावसाळी समस्यांनी त्रस्त असताना सत्ताधाऱ्यांकडून शक्तीप्रदर्शन सुरू असल्याची टीका मातेले यांनी केला आहे. नालेसफाईपेक्षा फोटोसेशन आणि प्रसिद्धीचा हव्यास जास्त अशीही टीका त्यांनी केली आहे.
