मुंबई : नागरिकांना सुरक्षितपणे आणि सुलभपणे चालता यावे यासाठी आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संकुले, व्यावसायिकांनी पदपथांवर अनधिकृतपणे उभारलेले उतरंडीचे मार्ग (रॅम्प), अतिक्रमणे, व्यावसायिक बांधकामे अथवा अन्य कोणत्याही स्वरुपाचे अडथळे एक महिन्याच्या आत स्वखर्चाने काढून टाकावेत, अन्यथा महानगरपालिकेकडून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिला.
पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पादचारी प्रथम अर्थात ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान मुंबईत राबवण्याचे ठरवले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने आश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील पदपथांची पाहणी केली. विलेपार्ले – गोरेगाव परिसरातील स्वामी विवेकानंद मार्ग, राम गणेश गडकरी मार्ग, बंडू गोरे मार्ग, गोरेगाव रेल्वे स्थानक मार्ग, शेठ देवराजजी गुंदेचा चौक, गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळील टोमॅटो गल्ली, दूध सागर मार्ग आदी परिसराची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना सुलभपणे चालता यावे, यासाठी पदपथांवरील अतिक्रमण संपूर्णतः हटवण्याचे निर्देश आश्विनी भिडे यांनी या पाहणी दौऱ्यात दिले.
आश्विनी भिडे यांनी पदपथांवरील अतिक्रमणे, रॅम्प, व्यावसायिक बांधकामे तसेच नागरिकांच्या पादचारी मार्गात येणारे अन्य अडथळे यांचा आढावा घेतला. पदपथांची उपलब्ध जागा पूर्णपणे नागरिकांच्या वापरासाठी खुली करून देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ‘पादचारी प्रथम’ या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ अतिक्रमण संपूर्णतः हटवून ते नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्यात येणार आहेत. तसेच, के पश्चिम विभागातील एकूण ३५५ मार्गांपैकी २७ मार्ग हाती घेण्यात आले आहेत. या २७ मार्गांवरील ३७.७ किलोमीटर अंतराइतके पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत.
गृहनिर्माण सोसायट्यांना इशारा
विलेपार्ले – गोरेगावदरम्यानच्या विभागातील पदपथांवर गृहनिर्माण संस्थांकडून अथवा गाळेधारकांकडून त्यांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेले उतार (रॅम्प) अनेक ठिकाणी नागरिकांच्या चालण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांना अशा अडथळ्यांमुळे पदपथ सोडून रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. ही बाब गांभीर्याने घेत आयुक्तांनी अशा प्रकारचे रॅम्प तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले.
संबंधितांनी एक महिन्याच्या आत स्वतःहून अशी अतिक्रमणे काढून पदपथ पूर्ववत करावेत. मात्र, या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे भिडे यांनी स्पष्ट केले. यासह पदपथांवर काही ठिकाणी व्यावसायिकांचे स्टॉल्सही आहेत. त्यांचा रहदारीला अडथळा निर्माण होतो. या स्टॉल्सधारकांनाही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
व्यावसायिकांचे स्थलांतर करा
गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत असल्याने संबंधित व्यावसायिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याचे निर्देश भिडे यांनी दिले. बंडू गोरे मार्गाची लांबी ३५० मीटर असून रुंदी १३.४० मीटर आहे. या मार्गावरून दररोज सुमारे ७० हजार रेल्वे प्रवासी वापर करतात. पहिल्या टप्प्यात गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील ४३ व्यावसायिक बांधकामे हटविण्यात आली असून, रस्ताचे रुंदीकरण करण्यात येणार आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्यात स्वामी विवेकानंद मार्ग आणि बंडू गोरे मार्गाच्या जंक्शनवर आवश्यक वळणाची रचना करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी सुमारे ११ बांधकामे प्रभावित होत असून, ती या वर्षअखेरपर्यंत हटविण्याचे प्रस्तावित आहे. या कामांचा आयुक्तांनी आढावा घेतला.
