मुंबई : मुंबईकरांना सुरक्षित, सलग व अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुंबई शहर व उपनगरांमध्ये पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अडथळे, साठवणूक साहित्य, फलक, बॅनर तसेच पादचारी मार्गात येणारे अन्य अडथळे दूर केले. पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यापैकी ८१ पदपथांचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे ६८ किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून ४४३ कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.
यासोबत या अभियानाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत १ ते १४ ऑगस्ट या १४ दिवसांच्या कालावधीत एकूण ३३७ कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७७ अनधिकृत बांधकामे आणि ११२ अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले आहे. यासोबतच पदपथांवरील ४९ स्ट्रीट फर्निचर, ६३ साठवणूक साहित्य, २७ दुकानांचे फलक, १४ साईनबोर्ड आणि ४९ बॅनर हटविण्यात आले. पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या २५ अधिकृत दुकानांलगतच्या संरचनांची दुरुस्ती, ८ पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवर निर्माण झालेल्या ८ अनधिकृत वाहनतळे हटविण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पदपथ हे केवळ पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी नसून शहरातील सुरक्षित आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत, या भूमिकेतून महानगरपालिका प्रशासनाकडून पदपथ सुधारणा आणि अतिक्रमण निर्मूलनाला प्राधान्य देण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यांत पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असलेल्या तसेच ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती आणि इतर संवेदनशील घटक मोठ्या प्रमाणावर वापर करतात अशा ठिकाणच्या पदपथ सुधारणांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बस थांबे, रुग्णालये, धार्मिकस्थळे, बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे.
पादचारी प्रथम’ अभियान हे केवळ अतिक्रमण हटविण्यापुरते मर्यादित नसून पदपथांची एकूण गुणवत्ता आणि वापरयोग्यता सुधारण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत आहे. अनधिकृत किंवा अयोग्य रॅम्प हटविणे, मालमत्तेची प्रवेशद्वारे पदपथावर न उघडता मालमत्तेच्या हद्दीत आत उघडणे, झाडांची योग्य छाटणी करणे, प्रमाणित रचनेनुसार पदपथांची बांधणी करणे आणि पदपथामध्ये असलेले पातळीतील फरक, तुटलेले भाग व अन्य भौतिक अडथळे दूर करून पादचारी मार्गाची सलगता कायम ठेवणे यावर भर देण्यात आला आहे.
४४ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे
मुंबईतील जवळपास ५० टक्के दैनंदिन प्रवास पायी केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी असमान किंवा खचलेले पदपथ, चालण्याच्या जागेतील अडथळे, अपूर्ण अथवा सदोष पदपथ रचना, फलक-बॅनर, झाडे, साठवणूक साहित्य, फेरीवाल्यांचा पसारा, अनधिकृत रॅम्प, पार्क केलेली किंवा बेवारस वाहने आदींमुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच वाहतूक कोंडी, वाहनांचा वेग कमी होणे आणि त्यातून होणारे वायुप्रदूषण यांसारखे परिणामही होतात. मुंबई रस्ता सुरक्षेचा वार्षिक अहवाल २०२३ नुसार रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे होते.
पंधरवड्याला आढावा
प्रत्येक विभागातील किमान ९० टक्के पदपथांची दर महिन्याला पाहणी करून त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागाकडून साप्ताहिक अहवाल सादर केला जाणार असून, त्यात पदपथाचे किंवा लगतच्या रस्त्याचे नाव, कारवाईची तारीख, कारवाईचे स्वरूप तसेच कारवाईपूर्वी आणि कारवाईनंतरची छायाचित्रे यांचा समावेश राहणार आहे. परिमंडळातील उप आयुक्तांकडून या अहवालांची पडताळणी करण्यात येणार असून, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून अंमलबजावणीच्या प्रगतीचा दर पंधरवड्याला आढावा घेतला जाणार आहे. तसेच मार्ग पोर्टलवरून प्राप्त होणाऱ्या पदपथांवरील अतिक्रमणासंदर्भातील तक्रारींचे विहित कालमर्यादेत निराकरण करून त्याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.
कारवाईनंतर सातत्याने देखरेख
पदपथ मोकळे केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी सातत्याने पाहणी करण्यावरही संबंधित प्रशासकीय विभागांकडून भर देण्यात येत आहे. दरम्यान, पादचाऱ्यांना सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देत ‘पादचारी प्रथम’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक तसेच अन्य घटकांनी पदपथांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा अडथळा निर्माण करू नये. पदपथांवर पुन्हा अतिक्रमण किंवा अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
