मुंबई : पीओपी गणेशमूर्तींवरील याचिकेच्या सुनावणीचा निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला असून विसर्जनाबाबत अद्याप निर्देश दिलेले नाहीत. तरीही मुंबईतील चौपाट्यांवरील गणेशमूर्ती विसर्जन स्थळांवर ओहोटीची रेषा चिन्हांकित करण्याची तयारी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी पालिका तब्बल २ कोटी ७७ लाख ९८ हजार ४९३ रुपये खर्च करणार आहे.

गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक असून प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याविरोधातील जनहित याचिकेवर गेला महिनाभर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या युक्तिवादावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या मूर्तींच्या विसर्जनाबाबत न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना मुंबईतील गणेशमूर्ती विसर्जन स्थळांवर ओहोटीची रेषा चिन्हांकित करण्याच्या कामाची पालिकेने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबईत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व माघी गणेशोत्सव हे सण मुंबईकर मोठ्या प्रमाणावर साजरे करतात. या सणांच्या शेवटी समुद्रात मूर्ती विसर्जन केल्या जातात. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याविरोधातील जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही पीओपीच्या गणेशमूर्तींचा वाद न्यायालयात गेला होता. तेव्हा गेल्यावर्षी ९ जून रोजी अंतरिम आदेश देताना पीओपीपासून तयार केलेल्या मूर्ती आणि त्यांच्या विक्रीवरील बंदी उठवली होती. तसेच पीओपी मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांतील विसर्जन करण्यास बंदी घातली होती. हा अंतरिम आदेश सध्या कायम आहे. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत सध्या तरी संभ्रम कायम आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी जारी केलेल्या मूर्ती विसर्जनासाठीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मूर्तींचे विसर्जन समुद्रातील ओहोटीची रेषा व भरतीची रेषा यांच्यामधील नॉन-इको सेन्सिटिव्ह क्षेत्रातच करणे बंधनकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संबंधित प्राधिकरणांशी सल्लामसलत करून ओहोटीची रेषा व भरतीची रेषा पूर्वनियोजितरित्या ओळखून चिन्हांकित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

२१ ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी मार्गदर्शक तरंगचिन्हे

– मुंबईतील समुद्रात प्रामुख्याने २१ ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. या प्रमुख २१ ठिकाणी समुद्रात ५०

मार्गदर्शक तरंगचिन्हे (मरीन नेव्हिगेशन बॉयज) स्थापित करण्यात येणार आहेत.

– विसर्जन कार्य व्यवस्थापन करणाऱ्या भूस्तरीय कर्मचाऱ्यांना ओहोटीची रेषा ओळखता येईल. रात्रीच्या वेळी ही मार्गदर्शक तरंगचिन्हे स्पष्टपणे दिसावेत, म्हणून त्यावर सौर दिवा बसविण्यात येणार आहेत आणि ही तरंगचिन्हे (बॉयज) समुद्रातील लाटांमुळे वाहून जाऊ नयेत म्हणून त्यांना समुद्राच्या तळाशी दोरीने बांधून स्थिर करण्यात येणार आहे.

– महापालिकेतर्फे समुद्रातील मूर्ती विसर्जन स्थळांवर ओहोटीची रेषा चिन्हांकित करण्यासाठी ३ वर्षांच्या कालावधीकरिता कंत्राट देण्यात येणार आहे.