मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिकेने विसर्जित प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींचे संकलन, सुरक्षित साठवण, शास्त्रीय प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी एकात्मिक कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेने सर्व विभागीय सहायक आयुक्तांना सविस्तर प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. कृत्रिम तलाव, तात्पुरते विसर्जन तलाव आणि जलाशयांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती २४ तासांच्या आत बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रक्रिया केलेल्या साहित्यापासून नवीन मूर्ती, प्लास्टर बोर्ड, सिरॅमिक, वैद्यकीय प्लास्टर, विटा किंवा सिमेंट उद्योगातील फिलर म्हणून पुनर्वापर केला जाणार आहे.

पीओपीच्या सहा फुटांवरील उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात महत्त्वाचा निर्णय दिला. अशा मूर्तींचे गतवर्षीप्रमाणे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन केलेल्या या मूर्तींचे संकलन करून त्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या मूर्तीच्या विल्हेवाटीसाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार

प्रत्येक विभागाने स्वतंत्र समन्वय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ, वैयक्तिक सुरक्षा साधने, क्रेन आणि योग्य प्रकारे आच्छादित वाहने उपलब्ध करावीत. बाहेर काढलेल्या मूर्ती केवळ निश्चित केलेल्या मुलुंड येथील मूर्ती उतरविण्याच्या साठवण सुविधेपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचविण्यात येणार आहेत. संपूर्ण कार्यवाहीची विभागनिहाय नोंद, वजनकाट्याच्या पावत्या, तसेच छायाचित्रे आणि चित्रफिती नोंदी जतन करणे बंधनकारक आहे. संबंधित सहायक आयुक्त हे परिमंडळीय उपायुक्तांच्या देखरेखीखाली दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवतील, असेही यात म्हटले आहे. या उपक्रमामुळे जलस्रोतांचे संरक्षण होण्यासह विसर्जित पीओपी मूर्तींच्या संकलनापासून शास्त्रीय पुनर्चक्रीकरण आणि उपयुक्त पुनर्वापरापर्यंत पर्यावरणपूरक चक्रीय व्यवस्था निर्माण होणार आहे.

२८५० मेट्रीक टन पीओपी मूर्ती

यासोबतच महानगरपालिकेने सुमारे २,८५० मेट्रिक टन पीओपी गणेशमूर्तींच्या साहित्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी अनुभवी संस्था आणि तंत्रज्ञान पुरवठादारांकडून स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागविले आहेत. इच्छुक संस्था रासायनिक विघटन किंवा अन्य शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित व पर्यावरणीय नियमांशी सुसंगत तंत्रज्ञान प्रस्तावित करू शकतात. प्रक्रिया केलेल्या साहित्याचा नवीन मूर्ती, प्लास्टर बोर्ड, सिरॅमिक, वैद्यकीय प्लास्टर, विटा किंवा सिमेंट उद्योगातील फिलर म्हणून पुनर्वापर करता येऊ शकतो. स्वारस्य पत्रांमधून पात्र संस्थांची पुढील निविदा प्रक्रियेसाठी निवड करण्यात येणार आहे. स्वारस्य पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ पर्यंत आहे. अधिक माहिती portal.mcgm.gov.in/tenders येथे उपलब्ध आहे.