मुंबई : पीओपी गणेशमूर्तींवरील याचिकेच्या सुनावणीचा निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवलेला असला तरी शनिवारी आणि रविवारी मुंबईतील अनेक मंडळांनी पीओपीच्या उंच गणेशमूर्तीं वाजतगाजत मंडपात आणल्या. त्यामुळे या मूर्तींच्या विसर्जनाबाबत न्यायालयात आता काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आपल्या मंडळाची मूर्ती पीओपीची आहे का आणि किती उंचीची आहे याची माहिती मंडळांना मंडपासाठी अर्ज करताना पालिकेकडे द्यावी लागणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमुर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याविरोधातील जनहित याचिकेवर गेला महिनाभर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या युक्तीवादावरील निर्णय न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. गेल्यावर्षीही पीओपीच्या गणेशमुर्तींचा वाद न्यायालयात गेला होता. तेव्हा गेल्यावर्षी ९ जून रोजी अंतरिम आदेश देताना पीओपीपासून तयार केलेल्या मुर्ती आणि त्यांच्या विक्रीवरील बंदी उठवली होती. तसेच पीओपी मुर्ती नैसर्गिक जलस्रोतांतील विसर्जनाला बंदी घातली होती. हा अंतरिम आदेश सध्या कायम आहे. त्यामुळे पीओपीच्या मुर्तीच्या विसर्जनाबाबत सध्यातरी संभ्रम कायम आहे. असे असताना मुंबईतील जवळपास सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पीओपीच्या मुर्तीची आधीच नोंदणी केली होती व या तयार झालेल्या मुर्ती मंडपात दाखल होण्यास १५ ऑगस्टपासून सुरूवातही झाली. या आगमन मिरवणूकांची छायाचित्रेही समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहेत.
दरम्यान, मातीच्या मुर्तींसाठी आग्रह धरणारे मुर्तीकार वसंत राजे यांनी याबाबत सांगितले की, पीओपी मुर्तींचे विसर्जन फक्त कृत्रिम तलावातच झाले पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. गेल्यावर्षी न्यायालयाने निर्बंध घातल्यानंतरही राज्य सरकारने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या मुर्ती तयार केल्या गेल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या भूमिकेत घुमजाव केल्यामुळे हा संभ्रम वाढला असल्याचा आरोपही राजे यांनी केला आहे.
मुर्ती पीओपीची आहे का, किती उंच आहे ?
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे मुंबई महापालिकेने मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्याकरीता प्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरीत ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताही सुरूवात झाली आहे. या अर्जामध्ये मंडळांना काही प्रश्न यंदा विशेषत्वाने विचारले जात आहेत. त्यामध्ये गणेशमुर्ती पीओपीची आहे का आणि मुर्तीची उंची किती आहे याची माहिती विचारली जात आहे. तसेच विसर्जनाची तारीखही विचारली जात आहे. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी गणेशमुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहनही केले जात आहे. उच्च न्यायालयात सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात सुनावणी सुरू असल्याने माननीय उच्च न्यायालयाकडून पारित होणारे आदेश सर्व गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असून सदर निर्देशांचे अधिन राहून गणेशोत्सेव मंडळांना परवानगी देण्यात येत आहे असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
