मुंबई : महापालिका प्रशासनाने ए, बी, सी, डी व ई विभागातील विभागातील खड्डे बुजविण्यासाठी तयार केलेला ३.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अशातच पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने २ कोटींचा नवा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. खड्डे बुजविण्यासाठी शीत मिश्रणाचा (कोल्ड मिक्स) पुरवठा करण्याचे कंत्राट मे. मित्तल पेट्रो फार्मा केम या कंपनीला देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. खड्ड्यांवर सुरू असलेल्या या उधळपट्टीमुळे प्रशासनाच्या खड्डेमुक्त शहराच्या उद्देशाबाबतच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शहर भागातील विभाग ए, बी, सी, डी आणि ई मधील दुरवस्था झालेले रस्ते, दोषदायीत्व कालावधीमध्ये नसलेले व पावसाळ्यादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने तब्बल ३.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली नाही. काँक्रीटीकरणावर कोटींचा खर्च करूनही केवळ शहर विभागातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी पुन्हा कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाला टीकेला तोंड द्यावे लागले. आता पुन्हा खड्डे बुजविण्यासाठी शीत मिश्रणाचा पुरवठा करण्याबाबत पालिका पुन्हा २ कोटी खर्च करणार आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या सहा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या ९०० किमी रस्त्याची देखभाल व परिरक्षण महानगरपालिका प्रशासनामार्फत केले जाते. शहराच्या भौगोलिक स्थितीमुळे म्हणजेच उच्च भूजल पातळी, अतिवृष्टी या कारणामुळे रस्त्यावर खड्डे पडत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो.
दरम्यान, पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने खड्ड्यांमध्ये वाढ होते. सद्यस्थितीत पावसाळ्याच्या कालावधीत अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. मुंबईतील सहा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी शीत मिश्रणाचा पुरवठा करण्याबाबत पालिकेने कंत्राटदारांची निवड केली आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक हजार मेट्रिक टन इतक्या शीत मिश्रणाचा पुरवठा कंत्राटदाराकडून केला जाणार आहे. या कंत्राटासाठी पालिकेला दोन कंत्राटदारांकडून तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यातील एक निविदा अप्रतिसादात्मक ठरली. उर्वरित दोन निविदांपैकी मे. मित्तल पेट्रो फार्मा केम यांनी उणे २५ टक्के रकमेने काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार पालिकेने मे. मित्तल यांनी निवड केली. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायीच्या बैठकीत पालिकेच्या या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डेमुक्त शहराचे वचन दिले होते. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. अजूनही अनेक सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आढळतात. कंत्राटदारांच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यांच्या कक्षांबाहेर कंत्राटदारांच्या रांगा लागलेल्या असतात. – किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेत्या (मुंबई महानगरपालिका)
सिमेंट काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर एकही खड्डा दिसल्यास दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. पाच वर्षांपूर्वी खड्ड्यांवर २१८ कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा खड्ड्यांवरचा खर्च ४५ कोटींवर आणण्याचा प्रयत्न आहे. मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळे खड्डे पडत असल्याने त्यात ५ – १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच काँक्रिटीकरणामुळे रस्त्यांच्या दर्जात सुधारणा झाली आहे. पुढच्या १० वर्षात खड्डे बुजविण्याच्या कामात २ हजार कोटींची बचत होणार आहे. – गणेश खणकर, सभागृह नेते (मुंबई महानगरपालिका)
बाहेरून शीत मिश्रणाची गरज का ?
उपायुक्त (सुधार) या कार्यालयामार्फत लोअर परळ येथील अस्फाल्ट प्लांटचा (शीत मिश्रण) भूखंड भाडेतत्त्वावर देण्याची कार्यवाही सुरू असून एप्रिलपासून शीत मिश्रणाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या २६ विभाग कार्यालयाच्या हद्दीत पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराकडून पालिकेला शीत मिश्रणाचा पुरवठा केला जाईल.
खड्ड्यांबाबत पाच हजार तक्रारी
यंदा पावसाळ्याच्या कालावधीत जूनपासून आतापर्यंत संपूर्ण मुंबईतून ५ हजार ६४२ तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यातील १५६ तक्रारी अन्य प्राधिकरणाच्या रस्त्यांवरील असल्याने संबंधित खात्यांकडे त्या पाठविण्यात आल्या. उर्वरित ५ हजार २४५ खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे पालिकेने निवारण केले. असे असूनही शहरात अद्याप रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
