लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असून मुंबईत अद्याप नालेसफाईच्या कामांना वेग मिळालेला नाही. महानगरपालिका प्रशासनाने मान्सून पूर्व नालेसफाईसाठी ९६०७१३.४१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ १ ते २ टक्के गाळ उपसा करण्यात आल्याने यंदाही पावसाळ्यात मुंबईची तुंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, येत्या ४ एप्रिलपासून मोठे नाले व मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात केली जाणार आहे.

पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाई करण्यात येते. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढला जातो. तसेच पावसाळ्यानंतर १० टक्के गाळ काढला जातो. मात्र, अद्यापही नालेसफाईच्या कामांना गती मिळाली नसल्याने चिंता व्यक्त केली जात. दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्येवरून पालिकेला टीकेला तोंड द्यावे लागते. यंदाही नालेसफाईला विलंब झाल्याने कमी कालावधीत नालेसफाई पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर ठाकले आहे.

महानगरपालिका मुख्यालयात आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नालेसफाईच्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. पालिकेने नालेसफाईचे अपेक्षित उद्दिष्ट गाठले नसले, तरीही नालेसफाईच्या कामात हयगय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, गाळ काढण्याच्या कामात गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली असून गाळ काढताना, गाळ वाहनांमध्ये भरताना आणि तो उतरवताना छायाचित्र घेणे अनिवार्य असून एकही चूक झाल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेने नालेसफाईसाठी शहर विभागात ४५ डंपर, पश्चिम उपनगरात ११४, तर पूर्व उपनगरात ४९ डंपर उपलब्ध केल्याचेही त्यांनी नमूद केले. नालेसफाईचा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने पालिका प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला केली.

मिठी नदीचा १४० कोटींचा निधी मानखुर्दमधील उड्डाणपुलासाठी वळविला

आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात मिठी नदी व अन्य नद्या – नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत साधारण १० कोटी रुपयांचीच कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे उर्वरित १४०.६२ कोटी रुपये शीव – पनवेल द्रुतगती मार्गावरील महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्गालगत टी जंक्शन आर्म – १ आणि आर्म – २ उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ३४४ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ती अपुरी असल्याने मिठी नदीसाठी प्रस्तावित करण्यात आलेला निधी त्या प्रकल्पासाठी वळविण्यात आला आहे. मिठी नदीचे काम केलेल्या कंत्राटदाराला पैसे दिल्यानंतर १४० कोटी निधी शिल्लक राहिला आहे. तो अन्य कामांसाठी न वापरल्यास अखर्चित राहील, असे प्रशासनाने सांगितले.