मुंबई : मुंबई खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडून रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा सपाटा लावणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला पावसाळा सुरू होताच वृक्ष पडझडीमुळे खडबडून जाग आली असून भविष्यात रस्ते, पदपथ, पर्जन्य जलवाहिनी आदींचे पुर्नबांधकाम करताना अस्तित्वात असलेल्या झाडांपासून सुरक्षित अंतर सोडून खोदकाम करण्याचे फर्मान प्रशासनाने जारी केले आहे. इतकेच नव्हे तर झाडांजवळ खोदकाम करताना जेसीबी अथवा पोकलेन यंत्राऐवजी मनुष्यबळाचा वापर करावा, असेही आदेश संबंधित विभागांना परिपत्रक जारी करून देण्यात आले आहे.
मुंबईमध्ये जुलैच्या अखेरीपासून दमदार हजेरी लावलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावामुळे मुंबईतील ठिकठिकाणचे ४८० मोठे वृक्ष उन्मळून पडले, तर झाडाच्या भल्यामोठ्या १,२३० फांद्या तुटून पडल्या. झाडांच्या पडझडीत तिघांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. झाडांच्या पडझडीमुळे महापालिकेच्या वृक्ष छाटणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वृक्ष पडझडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून या परिपत्रकात संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्ते काँक्रीटीकरणाची कामे दोन टप्प्यांत करण्यात येत असून पहिल्या टप्प्यांतील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर आहेत. मुसळधार पाऊस कोसळू लागतातच होणारी झाडांची पडझड लक्षात घेऊन आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात विकासकामांबाबत निर्देश दिले आहेत.
रस्ते, पदपथ, पर्जन्य जलवाहिन्या आदींचे पुनर्बांधकाम करताना अस्तित्वात असलेल्या झाडांपासून सुरक्षित अंतर ठेऊन (कमीत कमी १ मीटर) खोदकाम करावे. झाडांजवळ जेसीबी अथवा पोकलेन सारख्या अवडज यंत्राचा वापर करून खोदकाम करू नये, अशा ठिकाणी मनुष्यबळामार्फत खोदकाम करावे आणि झाडांच्या मुळांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.
त्याचबरोबर रस्ते, पदपथ, पर्जन्य जलवाहिन्या आदींचे पुनर्बांधकाम करताना लगतच्या झाडांच्या बुंध्यापासून कमीत कमी ०.३ मीटर ते १ मीटर जागा सोडून बांधकाम करावे. झाडाच्या भोवतालची जागा (आळे) काँक्रीट, डेब्रिजमुक्त असावी व त्यामध्ये काळी माती भरावी. आवश्यकेनुसार तेथे ट्री ग्रेट बसवावे. काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष तपासणी करून अस्तित्वात झाडांची पाहणी करवी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
रस्ते विभागातील अभियंत्यांवर रस्ते, पदपथांच्या पाहणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दररोज केलेल्या कार्यवाहिचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत. सहाय्यक अभियंत्यांनी हा अहवाल संकलित करून कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता यांना सादर करावा व उपप्रमुख अभियंतांनी सदर अहवाल प्रमुख अभियंता (रस्ते) यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प आणि महानगरपालिका आयुक्तांना सादर करावा. रस्ते अभियंत्यांनी पावसाळ्यात खड्डे भरण्याची कार्यवाही करताना झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतल्याची खात्री करावी, पाहणी दरम्यान धोकादायक, कललेल्या अथवा उन्मळून पडण्याची शक्यता असलेल्या झाडांबाबत तातडीने विभाग कार्यालयातील उद्यान विभागाला माहिती द्यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
