मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आर.टी.ई.) अंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला मंगळवार, १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. दुर्बल वंचित घटकांतील बालकांना २०२६-२७ या वर्षासाठी स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमधील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मुलांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत असेल.

मुंबईतील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५२ शाळांमध्ये ४ हजार ५५८ जागा आहेत. इतर मंडळांसाठी ७१ शाळांमध्ये १ हजार ३८१ जागा आहेत. अशा एकूण ३२३ शाळांमधे ५ हजार ९३९ राखीव जागा आहेत. आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रक्रियाअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक पालकांनी संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. पालकांनी आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरताना प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा आर.टी.ई. पोर्टलवर दिसतील.

पालकांनी अर्ज भरताना विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. तसेच, ज्या बालकांच्या प्रवेशासाठी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास त्या बालकासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन सोडत काढण्यासाठी तारीख निश्चित केली जाणार आहे. पालकांनी अर्ज भरताना ज्या आवश्यक कागदपत्रे नोंद केली आहे, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती प्रवेशासाठी तयार ठेवाव्यात, अशी माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.