मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनावर सातत्याने टीका केली जात असून सोमवारी शिक्षण समितीच्या सभेतही यावरून वातावरण पेटले. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून ते अन्न बनविण्याची जागा देखील अस्वच्छ असल्याचे आरोप शिक्षण समिती सदस्यांनी केले. पालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेनेने (ठाकरे) आक्रमक भूमिका घेत सभेत संताप व्यक्त केला.

महापालिकेच्या घाटकोपर येथील पंतनगर शाळेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मध्यान्ह भोजनात काचेचा तुकडा आढळून आला होता. त्यानंतर मध्यान्ह भोजनाच्या दर्जेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे (ठाकरे) अंकित प्रभू यांनी मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबत हरकतीच्या मुद्द्याद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले. महापालिकेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तपासण्याची तसदी पालिकेकडून घेतली जात नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, निकृष्ट दर्जाबाबत बचत गटांना विचारणा केल्यास सरकारकडून चांगले साहित्य दिले जात नसल्याचे सांगितले जाते. तसेच, ज्याठिकाणी भोजन बनविले जाते, त्याच्या स्वच्छतेबाबतही त्यांनी निराशा व्यक्त केली.

दरम्यान, विद्यार्थ्यांना दररोज खिचडी देण्याऐवजी आहारतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मध्यान्ह भोजनात बदल करावा, असेही त्यांनी सभेत सुचवले. प्रभू यांच्या हरकतीच्या मुद्द्याला नगरसेवक प्रमोद सावंत यांनीही पाठिंबा दिला. महापालिकेचे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा बाजार मांडत आहे. पालिकेकडे सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे.

निधीचाही अभाव नाही, तरीही मध्यान्ह भोजन बनविल्या जाणाऱ्या स्वयंपाकघराच्या दर्जावर देखरेख का ठेवता येत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांना भाजपच्या योजना ठोकळे आणि योगिता कोळी यांनीही पाठिंबा दिला. दरम्यान, मध्यान्ह भोजनाचा दर्जा आणि स्वयंपाक घरांच्या स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने पाच पर्यवेक्षकांची नेमणूक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर प्रमोद सावंत यांनी त्याचे खंडन केले. तसेच प्रशासन खोटे बोलत असून त्यांनी पर्यवेक्षकांच्या नावांची यादी जाहीर करावी, असे ते म्हणाले.

शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष द्यावे

– गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे. शिक्षण समितीच्या सभेत दरवर्षी मध्यान्ह भोजनाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, अद्याप अपेक्षित बदल जाणवले नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांनी या विषयात जातीने लक्ष घालावे, असे निर्देश समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिले.

– पालिकेने मध्यान्ह भोजन बनविणाऱ्या स्वयंपाक घरांची यादी दिली होती. मात्र, त्याठिकाणी भेट दिल्यास तेथे स्वयंपाक घरच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी अन्न सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे नगरसेवकांनी सुचवलेले बदल अंमलात आणावेत. – पुढील बैठकीत पालिकेने याबाबत मार्गदर्शक कार्यपद्धती तयार करून आणावी, असे आदेशही त्यांनी दिले. तसेच पालिकेचे पाच पर्यवेक्षक आणि स्वयंपाक घरांची माहिती सर्व सदस्यांना देण्याचेही त्यांनी नमूद केले.