मुंबई : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, पालिकेच्या शाळेतील समारंभ व अन्य औपचारिक कार्यक्रमांमध्ये यापुढे सहा कडव्यांचे वंदे मातरम् गीत सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत सभागृह नेते व भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी महापालिकेच्या सभेत ठरावाची सूचना मांडली होती. महापौर रितू तावडे यांनी ती मंजूर केल्यानंतर आता लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात एक शक्तीशाली नारा म्हणून उदयास आलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताची बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी रचना केली होती. या राष्ट्रीय गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचे गायन व वादनासाठी केंद्र शासनाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार सर्व सरकारी कार्यक्रम, अधिकृत औपचारिक समारंभ, राष्ट्रपती व राज्यपाल यांचे कार्यक्रम तसेच, शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे ३ मिनिटे व १० सेकंदांच्या संपूर्ण सहा कडव्यांचे गायन करणे बंधनकारक आहे. तसेच, त्या सन्मानार्थ (सावधान स्थितीत) उभे राहणेही आवश्यक आहे.
त्याला अनुसरुन झेंडावंदन, राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या कार्यक्रमात व भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत वाजविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमात आणि शाळांमधील समारंभ व अन्य औपचारिक कार्यक्रमात सहा कडाव्यांचे वंदे मातरम् वाजविणे अनिवार्य करण्याची ठरावाची सूचना खणकर यांनी महापालिका सभेत केली. त्यांनतर महापौरांनी या ठरावाच्या सुचनेला मंजुरी दिली.

