मुंबई : कंत्राटदाराने नमून्या दाखल सादर केलेल्या वस्तू आणि गतवर्षीच्या शिल्लक राहिलेल्या वस्तूंचे विद्यार्थ्यांना वाटप करून मुंबई महानगरपालिकेने यंदा मोठ्या उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला. जून अखेरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप हाेईल, असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केला होता. मात्र शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्यापपर्यंत अनेक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाही. मुंबई महानगरपालिकेच्या ९१८ शाळेतील विद्यार्थी २७ वस्तूंपासून वंचित आहेत. त्यामुळे वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
मुंबई महापालिकेच्या ९१८ शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ मोफत शालेय वस्तू देण्यात येतात. यामध्ये दोन गणवेश, दोन रुमाल, सँडल, काळे बूट, कॅन्व्हास बूट, काळे व सफेद मोजे, वह्या, दप्तर, पाण्याची बाटली, डबा, पीटी युनिफॉर्म, पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना छत्री, चौथी ते सातवील कंपास बॉक्स (साहित्यासह), १० पेनचे पाकिट, चित्रकलेसाठी ब्रश, पेन्सिल, कलर ट्रे, वॉटल कलर, पहिली ते तिसरीसाठी कंपास बॉक्स, १० पेन्सिलचे पाकिट, खोडरबर, गिरमिट, खडूचे कलर, मुलींना दोन रिबिन, एक हेअरबँड, सॅनिटरी नॅपकिन इत्यादी साहित्यांचा समावेश असतो. मात्र यंदा जेम पोर्टलद्वारे साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असल्याने साहित्य खरेदीच्या प्रक्रियेला विलंब झाल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी, शालेय संचासाठी तब्बल ९६ टक्के विद्यार्थी, तर वह्यांसाठी ९२ टक्के विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
छत्री, स्टेशनरी, चप्पल आणि गणवेश यांचे वितरणही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, रेनकोट, कंपास, पट्टी, रंगकामाचे साहित्याचे विरतण बऱ्यापैकी झाले आहे. अत्यावश्यक वस्तूंचे वितरण रखडल्याने महानगरपालिकेच्या शाळांमधील सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी अजूनही शैक्षणिक साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत. या विलंबामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे वह्याच नसल्याने वर्गातील टिपणी घेणे, गृहपाठ करणे आणि नियमित अभ्यास करणे कठीण झाले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मूलभूत शैक्षणिक साहित्य मिळण्यात होणारा विलंब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा ठरत असल्याबद्दल नाराजी पालकांकडून व्यक्त होत आहे.
यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम प्रणालीद्वारे शालेय साहित्य खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असून, या प्रक्रियेमध्ये प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्र पुरवठादार असल्याने खरेदी प्रक्रिया लांबली आहे. यापूर्वी पुरवठादाराकडून थेट खरेदी करण्यात येत असल्याने विलंब होत नव्हता. वह्या, छत्री आणि गणवेशासाठी खरेदी आदेश जारी करण्यात आले असून उर्वरित साहित्याची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. प्रलंबित साहित्याचे वितरण लवकरच पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, असे मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
