मुंबई : महानगरपालिकेच्या मलनिःस्सारण उदंचन केंद्रांचे कार्य अधिक सुरळीत, कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने चालविण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.

वांद्रे येथील अंतर्गामी उदंचन केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) आधारित माहिती व विश्लेषण केंद्राला नुकतीच डॉ. शर्मा यांनी भेट दिली. त्यावेळी मलनिस्सारण प्रचालन विभागाच्या प्रमुख अभियंता प्रचिती देसाई आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन विभागाद्वारे मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि आयपंपनेट यांच्या सहाय्याने वांद्रे येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) आधारित माहिती व विश्लेषण केंद्र कार्यान्वित करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून संभाव्य परिचालनात्मक अडचणींची पूर्वकल्पना घेणे, उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घेणे तसेच मलनिस्सारण उदंचन व्यवस्थेची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढविण्यास मदत होते. या भेटीदरम्यान डॉ. विपिन शर्मा यांनी माहिती व विश्लेषण केंद्राची कार्यपद्धती, निरीक्षण प्रणाली, तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मलनिस्सारण व्यवस्थापन प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. तसेच अंतर्गामी उदंचन केंद्राचे कार्य, तसेच माहिती व विश्लेषण केंद्राच्या माध्यमातून परिचालनाशी संबंधित माहितीचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया, केंद्राच्या प्रगत पूर्वानुमानात्मक विश्लेषण क्षमतांची त्यांनी पाहणी केली. तसेच, केंद्राच्या कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

व्यवस्था अधिक कार्यक्षम व विश्वासार्ह

माहितीच्या आधारे निर्णय घेण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हायला हवा. तसेच, मलनिस्सारण उदंचन केंद्रांचे कार्य अधिक अनुकूलित, कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने चालविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करावा, अशा सूचना डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि तंत्रज्ञान भागीदारांना दिल्या. तसेच, मुंबईतील मलनिस्सारण व्यवस्था अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि तत्परतेने कार्यान्वित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आणि पूर्वानुमानात्मक विश्लेषणाचा प्रभावी वापर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.