मुंबई : घराघरातून, इमारतींमधून येणारे सांडपाणी आणि मलमूत्राचे वहन करण्यासाठी असलेले मलनिस्सारणाचे जाळे अद्याप संपूर्ण मुंबईत पोहोचलेलेच नाही याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली. झोपडपट्ट्यामध्ये मलनिस्सारण वाहिन्याचे जाळेच नाही. त्यामुळे मलनिस्सारणाचे जाळे आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी पालिकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात हाती घेतलेला मुंबई मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. मुंबईच्या केवळ ८५ टक्के भूभागात हे मलनिस्सारण जाळे कार्यान्वित आहे. तर केवळ ८१ टक्के लोकसंख्येला या मलनिस्सारणाची सेवा उपलब्ध आहे. हे जाळे वाढवण्यासाठी मुंबई महापालिका आता सल्लागारांची नेमणूक करणार आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत घरोघरी शौचालय बांधण्याचा संकल्प काही वर्षांपूर्वी सोडण्यात आला होता. त्यासाठी नागरिकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. मात्र घरोघरी शौचालय बांधण्यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये जागाच नसल्यामुळे हे अभियान यशस्वी होऊ शकले नाही. तर अनेक झोपडपट्ट्यामध्ये मलनिस्सारण वाहिन्याच नसल्यामुळे तिथे सार्वजनिक शौचालय देखील बांधणे शक्य नव्हते. मुंबईतील सुमारे ६० टक्के जनता झोपडपट्टीत राहते पण या झोपड्यांमध्ये मलनिस्सारणाचे जाळेच नसल्यामुळे अनेक झोपडपट्ट्या, शौचालयांत वा बाहेर मलकुंभ (सेफ्टिक टँक) बसवले जातात.

या टँकची सफाई वेळच्या वेळी करणे आवश्यक असते. मात्र तसे न केल्यामुळे सेफ्टी टँकमध्ये विषारी वायू साठून त्याचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या असून त्यात काही नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील मलनिस्सारणाचे जाळे विस्तारण्यासाठी ‘मुंबई मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम’ (एमएसआयपी) हाती घेतला होता. मुंबईच्या सुमारे ६० टक्के भूभागाला मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे जोडलेले नव्हते. त्यामुळे मुंबईकरांना १०० टक्के मलनिस्सारण वाहिन्यांची सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प पालिकेने केला होता. मात्र हे उद्दिष्ट अद्याप अपूर्णच आहे.

नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार

– मुंबईमध्ये अन्य प्राधिकरणाच्या वसाहती आहेत. त्यात म्हाडा, विमानतळ प्राधिकरण, रेल्वेच्या वसाहती, बीपीटीच्या वसाहतींमध्येही मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे सुधारण्याची गरज आहे.

– पालिका आतापर्यंत अन्य प्राधिकरणाच्या हद्दीत पायाभूत सुविधांची कामे करीत नव्हती. परंतु नंतर नियमात बदल करून तिथेही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काळात हा भूभाग देखील मलनिस्सारण यंत्रणेमध्ये येऊ शकेल.

– मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे नसल्यामुळे अनेकदा झोपडपट्यांमधून, कारखान्यांमधून वाहणारे सांडपाणी थेट जवळच्या नदी -नाल्यात सोडले जाते तर कधी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होत असते. – मुंबई मलनिस्सारण सुधारण प्रकल्पाचा पुढचा भाग म्हणजे हे सगळे प्रवाह नव्याने बांधलेल्या मलनिस्सारण यंत्रणेमध्ये आणावे लागणार आहे. त्यासाठी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सविस्तर अहवालासाठी सल्लागाराची नेमणूक

मुंबईची भिन्न भौगोलिक स्थिती, भूगर्भीय स्तरातील अनिश्चितता, म्हाडाच्या अभिन्यासासारखे विस्तीर्ण क्षेत्र, उपलब्ध तांत्रिक कर्मचारी यामुळे हा प्रकल्प लांबला आहे. काही वेळा सीआरझेड, वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या जमिनी किंवा महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनींमध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकणे आवश्यक असते. अशावेळी विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेने या कामासाठी आता सल्लागार नेमण्याचे ठरवले आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याकरीता १२ सल्लागार संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे.

२०८०.२७९ किमी जाळे कार्यान्वित

मुंबईतील मलनिस्सारण प्रणाली ही तब्बल १३० वर्षापेक्षा जुनी आहे. मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे विस्तारण्याचा प्रकल्प गेल्या सात – आठ वर्षांपासून धीम्या गतीने सुरू आहे. २०१६ मध्ये मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे १८३० किमी एवढे होते. सध्या मुंबई महापालिकेने २०८०.२७९ किमी मलनिस्सारण वाहिनीचे जाळे कार्यान्वित केले आहे. विद्यामान मलनिस्सारण जाळे संपूर्ण मुंबईच्या ८५.७४ टक्के क्षेत्र आणि ८१.२८ टक्के लोकसंख्येला सेवा देते.