मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर प्रशासकीय राजवट संपली असून तब्बल चार वर्षांनी शुक्रवारी स्थायी समितीची पहिली बैठक होणार आहे. या पहिल्या बैठकीसाठी कार्यक्रम पत्रिकेचे वितरण करण्यात आले असून पहिल्या बैठकीसाठी तब्बल ५९ प्रस्ताव मंजूरीसाठी आणण्यात आले आहे. नवीन पूल, नाल्यांची दुरुस्ती, खर्चातील फेरफार, आरोग्य सेवा, प्रभाग स्तरावरचे खर्च अशा विविध विषयांवरील तब्बल २८०० कोटी रुपयांचे प्रस्ताव पहिल्या बैठकीत मंजूरीसाठी येणार आहेत.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली. तेव्हापासून गेली चार वर्षे मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होती. जानेवारीत पालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेना(शिंदे) महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. स्थायी, शिक्षण, बेस्ट आणि सुधार या चार वैधानिक समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. स्थायी समितीची विशेष सभा गेल्या आठवड्यात पार पडली असून या बैठकीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर या आठवड्याची बैठक शुक्रवारी ६ मार्च रोजी होणार आहे. शुक्रवारच्या बैठकीपासून कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.

स्थायी समितीची शेवटची बैठक मार्च २०२२ मध्ये पार पडली होती. त्यावैळी तब्बल ३०० प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षात प्रशासनाच्या पातळीवर प्रस्ताव मंजूर केले जात होती. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीसाठी ५९ विविध विषयांचे सुमारे २८०० कोटींचे प्रस्ताव मंजूरीसाठी आले आहेत. त्यापैकी गोरेगाव मुलुंड लिंक रोज प्रकल्पाचा भाग असलेल्या उड्डाणपूलाचा प्रस्ताव हा सर्वात महत्त्वपूर्ण प्रस्ताव असून या कामाचा खर्च २४०० कोटी रुपये आहे. अन्य विषयांचे प्रस्ताव हे एकत्रित सुमारे ४०० कोटींचे आहेत. भाजपचे अनुभवी नगरसेवक प्रभाकर शिंदे हे स्थायी समितीवर अध्यक्ष निवडून आले असून त्यांचा कार्यकाळ उद्यापासून सुरू होणार आहे.

स्थायी समितीवर २६ सदस्य असून त्यात शिक्षण समितीचे अध्यक्ष हे देखील स्थायी समितीचे सदस्य असतात. यावेळी शिवसेना (शिंदे) पक्षाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या चार सदस्यांबरोबर गट स्थापन केल्यामुळे या गटाला चार जागा स्थायी समितीवर मिळाल्या आहेत. एकूण २६ सदस्यांपैकी भाजपला १०, शिवसेना (ठाकरे) पक्षाला ७, काँग्रेसला ३, एमआयएम ला १, मनसेला १ असे बलाबल आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे १४ सदस्य आहेत. विरोधीबाकांवर १२ सदस्य आहेत. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करणे, रोखून धरणे हे सत्ताधारी पक्षाला सहज शक्य आहे.

स्थायी समितीवर हे सदस्य

भाजप – गणेश खणकर, प्रभाकर शिंदे, राखी जाधव, मकरंद नार्वेकर, हरीश भांदिर्गे, शिवकुमार झा, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रीती साटम, तेजिंदर तिवाना

शिवसेना (ठाकरे)- श्रद्धा जाधव, यशोधर फणसे, रमाकांत रहाटे, दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर,

शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी दोन गट – अमेय घोले, यामिनी जाधव, अंजली नाईक, डॉ. सईदा खान

काँग्रेस – आश्रफ आजमी, अजंता यादव, तुलीप मिरांडा

एमआयएम- विजय उबाळे

मनसे – यशवंत किल्लेदार