मुंबई : मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून लाखो कोटींचे प्रकल्प हाती घेतले असून या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी, प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी तितक्याच संख्येने सल्लागारांची संख्या वाढू लागली आहे. सल्लागारांचे प्रस्थ वाढत असल्याबद्दल स्थायी समिती सदस्यांनी मागील बैठकीत नाराजी व्यक्त केल्यानंतर शुक्रवारच्या बैठकीतही पटलावर पुन्हा सल्लागार नेमण्याचे प्रस्ताव प्रशासनाने सादर केले. त्यावर स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी आक्षेप घेतला.
‘उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठीही तुम्ही सल्लागार नेमाल’, असा खोचक टोला सभागृह नेते गणेश खणकर यांनी यावेळी लगावला. अखेर सल्लागार नेमण्याचे सगळे प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मागे ठेवले.मुंबई महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून सल्लागार उदंड झाल्याची टीका नगरसेवकांनी स्थायी समितीच्या मागील बैठकीत केली होती.
मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये सल्लागार कंपन्यांची भूमिका काय आहे, यावर स्थायी समितीच्या बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. सल्लागारांवर आतापर्यंत किती पैसे खर्च झाले त्याची यादी देण्याची मागणी सदस्यांनी केली. तेव्हा पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सल्लागाराला २३ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने बाजूला ठेवला.
स्थायी समिती सदस्यांनी मागील बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर अद्याप दिलेली नसताना स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत पाणीपुरवठा प्रकल्पांचे आणखी चार प्रस्ताव चर्चेसाठी आले होते. विशेष म्हणजे हे चारही प्रस्ताव सल्लागार नेमण्याचेच होते. इतकेच नाही तर एका विशिष्ट कंपनीलाच ही चारही कंत्राटे देण्याचे येणार आहेत. मात्र वारंवार सल्लागार नेमण्याचे प्रस्ताव येत असल्याबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हे सर्व प्रस्ताव मागे ठेवले.
स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत पाणी प्रकल्पाचे चार प्रस्ताव चर्चेसाठी आले होते. भांडूप संकुल येथे प्रतिदन २००० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जल उदंचन केंद्र उभारण्यासाठी सल्लागार नेमणे, गुंदवली जलबोगद्याच्या कूपकापासून नवीन ३००० मिमी व्यसाच्या जलवाहिनीचा आराखडा तयार करणे, मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नेमणे याबाबतचे प्रस्ताव शुक्रवारच्या बैठकीत चर्चेसाठी आले होते.
या प्रस्तावांना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी आक्षेप घेतला. पाणीपुरवठा प्रकल्पाची कामे यापूर्वी महापालिकेचे अभियंते करीत असत.मग आताच सल्लागारांना इतके महत्त्व का आले. सेवानिवृत्त अभियंत्यांच्या अनुभवाचा महाापालिकेने फायदा करून घ्यावा आणि त्यांना पॅनलवर घ्यावे, अशी सूचना फणसे यांनी केली.
मोडकसागर धरण बांधले तेव्हा कोण सल्लागार होते
मोडकसागर धरण बांधले तेव्हा कोण सल्लागार होते, असा सवाल यावेळी चर्चेदरम्यान सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला. महापालिकेने बांधलेले हे धरण पालिकेचे मुख्य अभियंता एन. व्ही. मोडक यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्याची आल्याची आठवण यावेळी खणकर यांनी करून दिली. मग आताच सल्लागारांची इतकी गरज का भासते, असा सवाल खणकर यांनी केला.
प्रत्येक प्रकल्पाचा आराखडा ठरवणे, निविदा तयार करणे, रक्कम ठरवणे ही सगळी कामे सल्लागाराकडून करून घेतली जातात. या कामासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांना मागच्या दाराने आणून त्यांचे भले केले जात आहे का, असाही सवाल त्यांनी केला. तसे असेल तर हे रॅकेट उद््ध्वस्त केले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. नाही तर उद्या पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्याचे कामही सल्लागाराकडून करून घेतले जाईल, असाही टोला खणकर यांनी लगावला.
