मुंबई : दादरमध्ये पश्चिम येथील वास्तू सेंट्रल इमारतीमधील मुंबई महापालिकेचे वाहनतळ गेल्या तब्बल तीन चार वर्षांपासून वापराविना आहे. या वाहनतळाच्या तळमजल्यावरील जागा नाट्यनिर्माता संघाला नाटकांचे स्टेस ठेवण्यासाठी देण्यात आली होती. मात्र पालिकेने आता नाट्यनिर्माता संघाला नोटीस देऊन ही जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
दादरमध्ये फेरीवाले, खरेदीसाठी आलेले नागरिक यामुळे चालायलाही जागा नसते. तसेच वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर होत असते. रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांमुळे या परिसरात वाहतूक कोंडीत भर पडत असते. तर दुसरीकडे वास्तू सेंट्रल या इमारतीतील पालिकेचे वाहनतळ मात्र विनावापर पडून आहे. जून २०२३ पासून या जागेच्या तळमजल्याचा वापर जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाकडून नाटकांचे सेट्स आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी करत आहे. सार्वजनिक वाहनतळाचा मूळ उद्देश बाजूला पडल्याने नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे.
पालिकेची निर्माता संघाला नोटीस
– राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत कोविड महामारीच्या काळानंतर नाट्यनिर्माता संघाला आपले साहित्य ठेवण्यास पालिका प्रशासनाने परवानगी दिली होती.
आधी जून २०२३ ते जून २०२४ पर्यंत मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यात मुदतवाढ करून जून २०२४ ते जून २०२६ या कालावधीसाठी मंजुरी दिली होती. हा कालावधी संपल्यानंतर आता पालिकेने निर्माता संघाला नोटीस बजावून जागा रिकामी करण्यास सांगितले आहे.
– बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, जे. के. सावंत मार्ग, दादर पश्चिम येथील कोहिनूर वाहनतळात मराठी नाट्यनिर्मात्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी तसेच वास्तू सेंट्रल बिल्डिंग येथील वाहनतळात नाटकांचे सेट्स व अन्य साहित्य ठेवण्यासाठी परवानगी देता येणार नाही.
– महानगरपालिकेने संबंधित संघाला सध्या वापरात असलेली वाहनतळाची जागा तात्काळ रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. जागा रिकामी न केल्यास महानगरपालिकेच्या लागू तरतुदींनुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.
वाहनतळ नागरिकांसाठी सुरू करा
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले की, “महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळाचा वापर वाहनांच्या पार्किंगसाठी होणे अपेक्षित आहे. एकीकडे दादर परिसरात पार्किंगसाठी जागेची कमतरता असताना महानगरपालिकेचे वाहनतळ वापराबाहेर राहणे योग्य नाही. पालिकेने संबंधित जागा तातडीने रिकामी करून घेऊन वाहनतळ नागरिकांसाठी सुरू करावे. तसेच, सार्वजनिक सुविधांचा वापर त्यांच्या मूळ उद्देशानुसार होतो की नाही, यावर नियमित देखरेख ठेवावी.”
कोविड काळात नाट्यनिर्माता संघाला नाटकाचे साहित्या ठेवण्यासाठी जागा दिली होती. जून २०२६ पर्यंत ही मुदत होती. त्यामुळे त्यांना नोटीस दिली आहे. या वाहनतळाची क्षमता ११४ वाहनांची आहे. मात्र विकासकाने या ठिकाणी सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. नाटकाचे सामान तळमजल्यावरील जागेत होते. दादरमधील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी ही जागा रिकामी करून आता वाहनतळासाठी योग्य सुविधा उभारण्याचे काम पालिकेतर्फे केले जाणार आहे. – योगेश देसाई, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर
