मुंबई : संख्याबळाअभावी स्थायी समितीत अनेक प्रस्ताव मागे ठेवण्याची नामुष्की काही आठवड्यांपासून सत्ताधारी महायुतीवर येत आहे. बुधवारी बैठकीतही एकूण २२ प्रस्तावांपैकी १२ प्रस्तावांवरील निर्णय स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी राखून ठेवले. तर रुग्णालयांना आहार पुरवण्याबाबतचे दोन प्रस्ताव मंजूर करताना स्थायी समिती अध्यक्षांनी मतदानात सहभाग घेत महायुतीचे पारडे जड केले.
स्थायी समितीत एकूण २६ सदस्य असून त्यात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस, मनसे, एमआयएम या विरोधी पक्षांचे १२ सदस्य आहेत, तर सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे) व भाजपचे १३ सदस्य आहेत. संख्याबळात केवळ एका सदस्याचा फरक असल्यामुळे स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी पक्षाला नेहमी संख्याबळाचे भान ठेवावे लागते. त्यामुळे बैठक संपेपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांना एकाच जागेवर बसून राहावे लागते.
बुधवारच्या बैठकीत विरोधी पक्षांपैकी ठाकरे गटाचे टी जगदीश हे गैरहजर होते. सत्ताधारी महायुतीपैकी शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सईदा खान अनुपस्थित होत्या. सत्ताधारी महायुतीचे दोन सदस्य एकाच वेळी अनुपस्थित राहिल्यामुळे महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करताना संख्याबळ कमी पडत होते. यावेळी सत्ताधारी व विरोधक दोघांचेही ११, ११ असे संख्याबळ होते. त्यामुळे बहुमताअभावी अध्यक्षांना १२ प्रस्ताव मागे ठेवावे लागले. तसेच गेल्या काही बैठकांमधील प्रस्तावही मंजुरीसाठी आले होते. त्यातीलही अनेक प्रस्ताव मागे ठेवावे लागले. त्यामुळे एकूण ३२ प्रस्ताव अध्यक्षांना राखून ठेवावे लागले.
महासभेत यापूर्वी दोनदा संख्याबळाअभावी प्रस्ताव राखून ठेवण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आल्यानंतर स्थायी समितीतही अनेकदा अशी वेळ महायुतीवर येत आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत २२ प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले होते. मात्र यापैकी तब्बल १२ प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्षांनी राखून ठेवले. त्यात घाटकोपरच्या खंडोबा टेकडीचा विकास, अपघात प्रवण क्षेत्र हटवण्यासाठी उपाययोजना, देवनार कचराभूमीसाठी पोकलेन मशीन भाड्याने घेणे असे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव पटलावर होते. या प्रस्तावांवर बोलण्यासाठी विरोधी पक्षातील काँग्रेस, ठाकरे गट, मनसे, एमआयएमचे नगरसेवक तयारीत आले होते. मात्र, मतदानाची वेळ आल्यास हे प्रस्ताव मंजूर करणे अवघड बनले असते. त्यामुळे अध्यक्षांनी हे प्रस्ताव राखून ठेवले.
ठाकरे गटाची मतदानाची मागणी
रुग्णालयासाठी धान्य व किराणामालाचा पुरवठा करण्याबाबतच्या प्रस्तावातील त्रुटींवर बोट ठेवत हा प्रस्ताव नव्याने आणावा, या मागणीसाठी यशोधर फणसे यांनी प्रस्ताव परत पाठविण्याची सूचना केली. त्यामुळे या सूचनेवर अध्यक्षांना मतदान घ्यावे लागले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची अडचण झाली. परंतु, अध्यक्षांनी स्वत: हात उंचावून मतदान करीत प्रस्ताव मंजूर केला.
