मुंबई : हिवाळा सुरू झाला की वाऱ्याच्या झुळुकीबरोबर काहीचा उग्र गंध अनुभवायला येतो. तसा तो गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही येऊ लागला आहे. या गंधाचा शोध घेतला की सात पानांच्या मध्येच उगवलेली सफेद फुलं नजरेस पडतात. सप्तपर्णीची ही झाडे हिवाळ्याच्या काळातच आपले अस्तित्व दाखवून देतात. उग्रवासाची ही सप्तपर्णी सध्या मुंबईत सगळीकडे बहरली असून संध्याकाळी त्यांचा उग्र गंध वातावरणात पसरतो. मात्र एका विशिष्ट कारणामुळे मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून या झाडाची लागवड करणे बंद केले आहे.
सप्तपर्णीची झाडे पूर्वी कोकणात आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर लावली जात असत. काहींना या झाडाच्या फुलांचा गंध आवडतो तर काहींना तो उग्र वाटतो. सप्तपर्णीच्या फुलांचा गंध संध्याकाळनंतरच पसरतो. या झाडावर सात पानांचा आणि त्यात फुलांचा असा गुच्छ असतो. म्हणूनच या झाडाला सप्तपर्णी किंवा सातवीण असेही ओळखले जाते. इंग्रजीत याला डेव्हिल्स ट्री असेही म्हटले जाते. सप्तपर्णीचा कुठलाही भाग तोडला तर त्यातून पांढरा दूधासारखा पदार्थ बाहेर पडतो. हा द्रव विषारी असतो असे म्हणतात तर काहींच्या मते त्याचा औषधी म्हणूनही उपयोग होतो. त्यामुळे या झाडाला मिल्क वूड ट्री असेही म्हणतात.
विषारी गुणधर्म, उग्र गंध आणि प्रचंड फुलोरा यामुळे या झाडाला डेव्हिल्स ट्री असे म्हटले जाते, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. झाड अतिशय मोठ्या प्रमाणात बहरत असल्यामुळे सावलीसाठी शहरात ही झाडे मोठ्या प्रमाणावर लावली जात होती. ही झाडे आता मोठी झालेली आहेत. पण नव्याने सप्तपर्णी न लागवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून इतर राज्यातील अहवालांचे अनुकरण करत मुंबई महापालिकेने ही झाडे लावण्याचे प्रमाण कमी करत बंद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सप्तपर्णी झाडाचे अलस्टोनिया स्कॉलारीज असे वनस्पतीशास्त्रातील नाव आहे. मुंबईत सप्तपर्णीची १५,२४१ झाडे आहेत. या झाडाला प्रचंड फुलोरा असल्यामुळे परागकणांचे प्रमाणही प्रचंड असते. हे परागकण वाऱ्याच्या झुळुकीबरोबर वातावरणात मिसळल्यामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांना, ॲलर्जीचा त्रास असलेल्यांना त्रास होतो. त्यामुळे मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता असलेल्या शहरात या झाडाची नव्याने लागवड केली जात नसल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन – तीन वर्षांपासून या झाडांची लागवड बंद असल्याचे त्यांनी सांगितले.
