मुंबई : मुंबई महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला आहे. या श्वानांना निर्बीजीकरण आणि लसीकरण केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्याऐवजी त्यांना आता कायमस्वरूपी निवारा देण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येणार आहे. यासाठी निवारा व्यवस्थापन, उपचार, खाद्यपुरवठा आणि आयुष्यभर देखभाल करण्यास सक्षम असलेल्या ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया या मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था आणि प्राणी कल्याण संस्थांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक श्वानाच्या देखभालीवर दररोज १५५ रुपये याप्रमाणे वर्षाला ५.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस थांबे आणि रेल्वे स्थानके अशा संस्थात्मक क्षेत्रात भटक्या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे या ठिकाणाहून श्वानांना हटवून निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिले होते. त्यामध्ये श्वानांना सुरक्षितपणे पकडून त्यांची नसबंदी व लसीकरण करून त्यांना योग्य निवारा आणि आहार, पाणी, उपचार व आयुष्यभर संगोपन करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाकडे सध्या आवश्यक त्या प्रमाणात स्थायी श्वान निवारा सुविधा उपलब्ध नाही. परिणामी, मुंबई शहरात पकडण्यात येणाऱ्या श्वानांसाठी सुरक्षित निवारा, उपचार, आहार, लसीकरण व आयुष्यभर देखरेखीची व्यवस्था करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. मुंबईत सुमारे लाखभर भटके श्वान असून केवळ आठच निवारे असल्याने त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेकडे पुरेसे निवारे उपलब्ध नाहीत.

अशी आहे योजना

मुंबई महानगरपालिकेकडे सध्या कायमस्वरूपी श्वान निवारा केंद्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे योग्य जागा उपलब्ध झाल्यानंतर केंद्र बांधण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने मार्च २०२६ मध्ये प्राणीमित्र संस्थांकडे स्वारस्य पत्रे मागवली होती. ज्या स्वयंसेवी संस्थांकडे श्वान निवारा सुविधा उपलब्ध असेल, तर महानगरपालिकेने पकडलेल्या भटक्या श्वानांना तिथे ठेवणे शक्य होईल. या श्वानांना आयुष्यभर सांभाळण्यासाठी पात्र संस्थांना प्रतिदिन मान्य केलेले मानधन महानगरपालिकेकडून अदा करण्यात येणार आहे.

तीन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त

महापालिकेने मागवलेल्या अर्जामध्ये सुरुवातीला केवळ एक प्रस्ताव प्राप्त झाल्याने मुदत १२ मार्च, त्यानंतर १८ मार्च आणि अखेरीस २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली. अंतिम मुदतीपर्यंत तीन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर तिन्ही संस्था पात्र ठरल्या असून त्यांचा गुणनिहाय निकाल तयार करण्यात आला आहे. नियुक्त संस्थेला श्वान महापालिकेकडून हस्तांतरित केल्यानंतरचा निवारा, आहार, उपचार आणि आयुष्यभर देखभालीचा खर्च करावा लागणार आहे. या कामाचे जीपीएस आधारित नोंदीकरण, फोटो लॉगिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियमित अहवाल देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. संस्थेच्या मासिक बिलाची महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतरच देयक अदा केले जाणार आहे.

एक हजार श्वानांसाठी दोन वर्षांचे कंत्राट

प्रारंभी एक हजार भटक्या श्वानांसाठी दर प्रति श्वान प्रति दिवस १५५ रुपये खर्च ठरवण्यात आला आहे. त्यामुळे एक हजार श्वानांसाठी प्रति दिवस खर्च १ लाख ५५ हजार रुपये, तर वार्षिक खर्च ५ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये येणार आहे. दोन वर्षासाठी ११ कोटी ३१ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. वस्तू व सेवा कर धरून एकूण कंत्राट खर्च १३ कोटी ३५ लाख १७ हजार रुपये असेल. सध्याच्या दरानुसार एका श्वानामागे सरासरी उर्वरित ९ वर्षांच्या आयुष्यासाठी देखभालीचा अंदाजित खर्च सुमारे ६.०० लाख रुपये इतका येतो. तथापि, प्रत्यक्ष खर्च हा निवाऱ्यात दाखल होणाऱ्या श्वानांची संख्या, त्यांचे वय, मृत्यूदर, दत्तक प्रक्रिया, न्यायालयीन निर्देश, शासन धोरणातील बदल, तसेच महानगरपालिकेकडून भविष्यात उभारण्यात येणाऱ्या श्वान निवारा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतो.