मुंबई : महायुतीतील सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये आलबेल नसल्याची कुजबुज सुरू असतानाच महापालिकेच्या राजकारणातही घडामोडींनी वेग घेतला आहे. ‘मातोश्री’चे निकटवर्ती आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सुधार समितीतील प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मध्यरात्री मोबाइलवरून संपर्क साधल्याचा केलेला दावा आणि त्यांनतर सुधार समितीच्या बैठकीत एकाही प्रस्तावाला मिळू न शकलेली मंजुरी शिवसेनेच्या (शिंदे) जिव्हारी लागली आहे. तसेच, फडणवीस आणि ‘मातोश्री’मधील जवळीक वाढत असल्याची कुजबूज शिवसेनेसाठी (शिंदे) मोठी डोकेदुखी बनू लागली आहे.

सुधार समितीच्या पटलावर एकूण सात प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. या प्रस्तावांना विरोधकांनी कडाडून विरोध केला. तसेच, हाताला काळ्या फिती बांधून विरोधकांनी प्रस्तावांचा निषेध केला. तसेच संबंधित प्रस्ताव लोकहित साधणारे नसल्याचा आरोपही केला. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनीही त्यावेळी प्रस्तावांवर जहरी टीका केली. त्यापूर्वी शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सुधार समितीतील चार प्रस्तावांवर संताप व्यक्त केला होता. त्यांनतर आदित्य ठाकरे यांची याबाबत ‘मातोश्री’चे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चाही झाली.

चर्चेनंतर मध्यरात्री २.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाइलवरून संदेश पाठवून संबंधित प्रस्ताव लोकहिताचे नसल्याचे कळवले. त्यावर पहाटे ४ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, असा दावा मिलिंद नार्वेकर यांनी केला. फडणवीस यांनी तातडीने संबंधित प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवून प्रस्ताव मंजूर न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या घडामोडीनंतर बुधवारी सकाळी सुधार समितीच्या बैठकीत सातही प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. त्या बैठकीत महायुतीच्या नगरसेवकांची पुरेशी संख्या होती.

संख्याबळाच्या जोरावर प्रस्ताव सहज मंजूर करता आले असते. मात्र, भाजपच्या नगरसेवकांची यासाठी साथ मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर मतदान घेण्यात आले नाही. सातपैकी दोन प्रस्ताव फेरविचारार्थ प्रशासनाकडे परत पाठविण्यात आले, तर उर्वरित प्रस्ताव समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी राखून ठेवले. त्यांनतर मिलिंद नार्वेकर यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत फडणवीसांसोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला. तसेच, प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले.

त्यामुळे फडणवीस आणि शिवसेनेच्या (ठाकरे) वाढत्या जवळीकीबद्दलच्या चर्चेमुळे शिंदें गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, या संदर्भात कुणाशीही संपर्क साधलेला नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. या घडामोडीमुळे सत्ताधारी मित्रपक्षात आलबेल नसल्याची जोरदार चर्चा महापालिकेत दबक्या आवाजात रंगू लागली आहे. दरम्यान, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या स्वतंत्र नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यावरूनही सत्ताधारी मित्र पक्षांतील खदखद समोर आली होती.

घाडी यांनी महापौर यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यापूर्वीही महापालिकेत एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अभिनेता अक्षय कुमार आलेला असताना, घाडी यांना आदरपूर्वक वागणूक मिळाली नव्हती. त्यावरूनही शिवसेनेने (शिंदे) नाराजी व्यक्त केली होती. त्यातच सुधार समितीत भाजपने शिवसनेला (शिंदे) पाठिंबा न दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. सातत्याने सुरू असलेल्या या घडामोडींमुळे सत्ताधारी पक्षातील दरी उघड झाली आहे.