मुंबई: भर उन्हाळ्यात मुंबई महापालिकेचे तीन जलतरण तलाव दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असल्याचे आढळून आले आहे. मुलुंड, चेंबूर आणि दहिसर येथील तलाव बंद असल्यामुळे पोहोणाऱ्यांची, व्यायामपटूंची मोठी गैरसोय होत आहे. चेंबूरचा तलाव कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितत आहे. तर मुलुंडचा तलाव सुरू होण्यास तब्बल एक महिना लागणार आहे.
मुंबई महापालिकेचे एकूण तेरा जलतरण तलाव विविध ठिकाणी आहेत. या तरणतलावाचे सभासदत्व घेण्यासाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. उन्हाळ्याच्या दिवसात तरणतलावात पोहोण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच शाळांना सुट्ट्या पडल्यामुळे लहान मुलेही मोठ्या संख्येने येत असतात. मात्र भर उन्हाळ्यातच मुंबई महापालिकेचे तीन जलतरण तलाव बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
त्यापैकी मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलातील जलतरण तलाव हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. याबाबत भाजपचे मुलुंडमधील ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, हा तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून सध्या त्याची दूरवस्था झाली आहे. लाद्या तुटल्या आहेत, पंप नादुरुस्त आहे, पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा बिघडली आहे. त्यामुळे या सगळ्या दुरुस्तीची कामे हाती घेतली असून ही कामे पूर्ण होण्यास एक महिना लागणार आहे. साधारण १ जूनला हा तलाव सुरू होईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. याबाबत गेल्याच आठवड्यात पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. यावेळी जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला देण्यात येणार नसून मुंबई महापालिकेचा संबंधित विभागच त्याची दुरुस्ती करणार आहे. त्यामुळे कामे दर्जेदार होतील असा विश्वास प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुलुंडच्या जलतरण तलावाचे व्यवस्थापन ज्या संस्थेकडे आहे त्या संस्थेवर महापालिकेचा अंकुश असतो. मात्र प्रशासकीय काळात याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तलावाची दूरवस्था झाल्याचे मतही शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
चेंबूरच्या तलावाला गळती ….
तर चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य जलतरण तलावाला गळती लागली असून सतत पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ही गळती शोधण्याचे आव्हान सध्या पालिकेच्या यंत्रणेसमोर आहे. ते काम कधी होईल याबाबत काहीच शाश्वती नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहिसरच्या तलावासाठी निविदा
दहिसर येथील तलावाबाबतही नागरिकांच्या मोठ्या तक्रारी असून हा तलावही अनेकदा बंदच असतो. भाजपचे नगरसेवक सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले की, दहिसरच्या तलावात क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी येत होत्या. तलावाचीही दूरवस्था झाली असून या कामासाठी लवकरच निविदा मागवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
