मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा आटल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र धरणांमधील जलसाठ्यात सुधारणा झाल्याने जलतरण तलावांना पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या १६ ऑगस्टपासून सकाळ किंवा सायंकाळच्या सत्रात जलतरणाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जलतरण तलावांची जलजोडणी पूर्ववत करण्याबरोबरच तलावातील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे आणि जलतरण निर्देशक – नि – जीवरक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील खालावत जाणारा पाणीसाठा आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन १७ जूनपासून महापालिकेने जलतरण तलावांची सुविधा बंद केली होती. मात्र आता सातही जलाशयांतील पाणीसाठ्याची सद्यस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित विभागीय सहायक अभियंत्यांशी संपर्क साधून जलतरण तलावांची जलजोडणी तातडीने पूर्ववत करण्यास सांगण्यात आले आहे. येत्या १६ ऑगस्टपासून जलतरण निर्देशक – नि – जीवरक्षकांची सुविधा १०० टक्के क्षमतेने उपलब्ध करण्यात येणार आहे.
जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणाची गाळणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू करून पाणी पोहण्यासाठी योग्य असल्याची खात्री करावी. तलावातील पाणी तांत्रिकदृष्ट्या पोहण्यासाठी योग्य आहे की नाही, याबाबत महानगरपालिका प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करून विश्लेषकाकडून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आदेश प्रशासनामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सर्व कार्यवाहीची पूर्तता येत्या १५ ऑगस्टपर्यंत करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे. त्यानंतर १६ ऑगस्टपासून सकाळ किंवा सायंकाळच्या सत्रात नागरिकांसाठी जलतरण तलावाची सुविधा सुरू होईल.
