मुंबई : निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेतील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती न केलेल्या शिक्षकांनाही निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीशीमध्ये निवडणुकीच्या कामासाठी हजर न राहिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील व खासगी अनुदानित शाळांमधील तब्बल २ हजार २७५ शिक्षकांची निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती केली होती. त्यानुसार या शिक्षकांनी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकालाची प्रक्रिया सांभाळत निवडणुकीचे कामेही केली. मात्र निवडणुकीच्या कामासाठी ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्या शिक्षकांची जनगणनेच्या कामावर नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र मागील तीन चार दिवसांपासून जनगणनेच्या कामावर असलेल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येत आहे. या नोटीशीमध्ये निवडणुकीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कामासाठी १६ एप्रिलपासून हजर राहण्याचे आदेश दिले असूनही आपण अद्यापपर्यंत हजर झालेला नाहीत. आपले हे वर्तन निवडणुकीच्या कामात जाणीवपूर्वक बाधा करणारे आहे.
आपण निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करत आहात असे निदर्शनास येत आहे. निवडणूक आदेशाची अमलबजावणी न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती केल्यासंदर्भात कोणतेही पत्र आम्हाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आले नाही. तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडूनही कोणतीही सूचना देण्यात आली नाही. सध्या आम्ही जनगणनेचे काम करत आहोत.
हे काम करत असताना अचानक ही नोटीस आल्याने काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शाळेचे मुख्याध्यापकांकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. त्यामुळे आता जनगणनेचे काम सोडून निवडणुकीच्या कामासाठी कसे जायाचे असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत शिक्षकांनी शिक्षक संघटनांना यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
व्हॉट्सॲपवर नोटीस जनगणनेच्या कामावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकाडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नोटीस पाठविण्यात आली आहे. ११ मेपासून शिक्षकांना या नोटीस व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आल्या आहेत. या नोटीशीमुळे शिक्षकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
