मुंबई : मराठी चित्रपटांना शहरातील मल्टिप्लेक्स सिनेमागृह उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्यावतीने अशी बहुपडदा चित्रपटगृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी स्थायी समितीने यावर्षी प्रथमच तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात एक कोटींची तरतूद करून या विषयाकरीता शीर्ष तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने अशी तरतूद केलेली नसताना स्थायी समितीने आपल्या अधिकारांत यासाठी तरतूद केली आहे.
मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या तब्बल ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने गेल्या आठवड्यात मंजूरी दिली. ही मंजूरी देताना स्थायी समितीने अर्थसंकल्पात काही विशिष्ट बदलही सुचवले आहेत. त्यात मराठी चित्रपटांसाठी बहुपडदा चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सध्या एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी सिनेमागृह बांधण्याचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
मल्टिप्लेक्स म्हणजे बहुपडदा सिनेमागृहांत मराठी चित्रपटांना प्राधान्य दिले जात नसल्याची निर्माते आणि वितरकांकडून तक्रार करण्यात येत असते. मराठी चित्रपटांसाठी हवा तो पडदा हवा तेव्हा उपलब्ध करून दिला जात नाही. हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिले जाते. एखादाच मराठी चित्रपट मल्टिप्लेक्स सिनेमागृहात लावला जातो.
विशेष म्हणजे मराठी चित्रपटांना प्रेक्षक असतानाही हे चित्रपट प्रदर्शित केले जात नसल्यामुळे महापालिकेने पुढाकार घेऊन मल्टिप्लेक्स सिनेमागृह बांधण्याची मागणी भाजपाने केली होती. परंतु महापालिकेने त्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे स्थायी समितीने त्यांना असलेल्या अधिकारात पालिकेतील सत्ताधारी भाजपा शिवसेना महायुतीने मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला अशा प्रकारची चित्रपटगृहे मुंबईत बांधणे भाग पडणार आहे.
स्थायी समितीने केलेल्या आर्थिक तरतुदीचा विचार करून नेमकी कुठे चित्रपटगृहे बांधावी त्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. मराठी लोकवस्ती तुलनेने अधिक असलेल्या लालबाग, परळ, दादर, वरळी, गिरगाव, माझगाव, शिवडी, चेंबूर, गोरेगाव, जोगेश्वरी, दहिसर आदी ठिकाणी ही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे बांधण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात चित्रपटगृहे बांधण्यासाठी नेमकी कुठे जागा आहे याचा शोध घेतला जाणार आहे. ही चित्रपटगृहे बांधण्यासाठी तरतूद केल्यानंतर या आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
